कोरोना काळातही उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण देशात निर्माण करायचे आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री म्हणाले की, युकेतील विषाणू सारखे किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला. गेल्या वर्षभरात सुविधा वाढवल्या. साडे तीन लाख बेड्स वरून साडे चार लाख बेड्स पर्यंत पोहचलो. प्रयोगशाळा वाढविल्या आहेत. कोविड केअर केंद्रे वाढवली आहेत पण दुसऱ्या लाटेत आपल्याला काही सुविधा अपुऱ्या पडतील की काय अशी भिती होती. ऑक्सिजनचा तुटवडा झाला पण सर्व मोठ्या कंपन्यांनी आम्हाला ऑक्सिजन उपलब्धतेसाठी सहकार्य केले.

    मुंबई :  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रमुख उद्योगपतींसोबत आज संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट आली आणि आणि लॉकडाऊन करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर, उत्पादनावर परिणाम होवू नये यासाठी आपण जसे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या  तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

    साप भी मरे और लाठी भी ना तुटे

    मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत अनलॉक करताना  त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. स्थानिक पातळीवर जीक्ळ प्रशासन निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक याबाबत निर्णय घेतील   ते म्हणाले की, साप भी मरे और लाठी भी ना तुटे असे आपल्याला वागावे लागेल.

    कंपन्यांचे ऑक्सिजन उपलब्धतेसाठी सहकार्य

    मुख्यमंत्री म्हणाले की, युकेतील विषाणू सारखे किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला. गेल्या वर्षभरात सुविधा वाढवल्या. साडे तीन लाख बेड्स वरून साडे चार लाख बेड्स पर्यंत पोहचलो. प्रयोगशाळा वाढविल्या आहेत. कोविड केअर केंद्रे वाढवली आहेत पण दुसऱ्या लाटेत आपल्याला काही सुविधा अपुऱ्या पडतील की काय अशी भिती होती. ऑक्सिजनचा तुटवडा झाला पण सर्व मोठ्या कंपन्यांनी आम्हाला ऑक्सिजन उपलब्धतेसाठी सहकार्य केले.

    १० लाख लस देण्याची तयारी

    ते म्हणाले की, बांधकाम कामगार तसेच राज्यातील इतर उद्योगांमध्ये बाहेरील राज्यातील जे कामगार काम करीत आहेत त्यांची आरोग्य विषयक नोंद व्यवस्थित ठेवा. त्यांनी त्यांच्या  राज्यात जाताना आणि तिकडून येताना कोविडचा विषाणू पसरवू नये. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखील माहिती ठेवा. कामगार परराज्यातून आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवावे, त्यांची तपासणी  करावी.

    पावसाची सुरुवात होते आहे. त्यामुळे रोगराई वाढू शकते, साथीचे रोग पसरतात. आपल्या कामगार आणि कर्मचारी यांना आरोग्याचे नियम पाळतील असे पहा. आरोग्य तपासण्या कराव्यात . बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचून मलेरिया, देणगी यासारखे रोग पसरणार नाही हे पहा. पूर्वी जसे सार्वजनिक ठिकाणी किंवा इतरत्र सर्रास धुम्रपान केले जात असे पण आज असे सार्वजनिक ठिकाणी कुणी धुम्रपान करताना दिसत नाही करण केवळ कायद्याचा बडगा नाही तर आता ती आपल्याला सवय लागली आहे.

    तसेच मास्क लावण्याच्या बाबतीत आपण सवय लावावी इत्यादी सूचना त्यांनी केल्या. ते म्हणाले की,दिवसाला ५ लाख लसीकरण आपण केले आहे. १० लाख लस देण्याची तयारी आहे पण लस उपलब्ध नसल्याने आपल्याला मर्यादा पडल्या आहेत.

     उद्योजकांच्या सूचना

    यावेळी उपस्थित उद्योजकांनी निर्बंधांसंदर्भात निकष आणि लेव्हल्स (पातळ्या) चा निर्णय चांगला असल्याचे म्हटले आहे. याबाबत लोकांमध्ये योग्य रीतीने जनजागृती होणे अपेक्षित आहे.  विशेषत: ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी उद्योजक मदत करतील व योगदान देतील.

    उद्योग क्षेत्राशी संबंधित असंघटीत वर्गाचे लसीकरण व इतर काळजी घेणे आवश्यक आयटी क्षेत्राने वर्क फ्रॉम होमवर पुढील काही महिना भर द्यावा,उद्योग व कारखान्यांत येणारे कर्मचारी यांचे लसीकरण, चाचणी याबाबत वर्गीकरण करावे. रस्त्यांवर पोलिसांचे चेक पोस्ट हटवावे म्हणजे वाहतूक संथ होणार नाही व गर्दी टळेल इत्यादी सूचना यावेळी करण्यात आल्या.

    या बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, संजीव बजाज, बी थियागराजन, डॉ नौशाद फोर्बस, अमित कल्याणी, अशोक हिंदुजा, ए एन सुब्रमनियन, डॉ अनिश शहा, अजय पिरामल,बनमाली अग्रवाल, हर्ष गोयंका, सुनील माथुर, उज्वल माथुर, संजीव सिंग, बोमन इराणी, निरंजन हिरानंदानी, जेन करकेडा, असीम चरनिया, सुलज्जा फिरोदिया सहभागी. याशिवाय टास्क फोर्सचे अधुक्ष डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी अनबलगन आदि उपस्थित होते.