कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी काही दिवस कडक टाळेबंदला सोमोरे जावे लागेल : विजय वडेट्टीवार

  मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट सक्रीय असून तिला रोखण्यासाठी राज्य सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न करत फोल ठरताना दिसत आहेत. कठोर निर्बंध लावूनही गर्दी कमी होत नसल्याने लोकांचे जीव वाचवण्यासाठी काही दिवस कडक टाळेबंदीला सामोरे जावे लागेल  अशी शक्यता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच विभागाव्दारे विनंती करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
  वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे. लशींचा तुटवडा निर्माण होऊनही महाराष्ट्राला पुरवठा केला जात नाही. याउलट गुजरातला जास्त लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन अपरिहार्य आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच विभागाव्दारे विनंती करणार असल्याचे त्यानी सांगितले. मुंबईतील लोकल प्रवासावर देखील पुन्हा एकदा निर्बंध आणण्याचा प्रस्ताव असून त्याबाबत विचार केला जात आहे, मध्य रेल्वेने सध्या फलाट तिकीट देणे बंद केले आहे, जेणे करून गर्दीला आळा घालता येईल असे ते म्हणाले.
  आरोग्य आणिबाणीची स्थिती
  येत्या दहा दिवसात राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दहा लाखांच्या घरात जाण्याची भिती जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात  आरोग्य आणिबाणीची स्फोटक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच सध्या औषधांचा, ऑक्सिजन आणि लशांचाही तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे रूग्णांच्या मृत्यूसंख्यते लक्षणीय वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. लोकांचे जीव वाचवायचे आहेत त्यामुळे विरोधकांनी यावरुन राजकारण करु नये असे आवाहनही त्यांनी केले. मागील महिन्यात एमपीएससीची परीक्षा रद्द झाली तेव्हा भाजपचे नेते रस्त्यावर उतरले. आतादेखील भाजपकडून व्यापाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावले जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
  गुजरातसह अनेक राज्यात टाळेबंदी
  सध्या देशाच्या अनेक राज्यात वेगवेगळ्या भागांत गरजे नुसार टाळेबंदी आहे. गुजरातमध्येही अनेक जिल्ह्यांत कडक टाळेबंदी आहे. भाजपचे नेते त्यावर काही बोलत नाहीत. फक्त महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तर भाजपचे नेते टीका करायला सुरुवात करतात, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
  अंतिम वर्षाचे डॉक्टर्सही सेवेत
  सरकारने अंतिम वर्षाच्या डॉक्टर्सना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनाही सेवेत सामावून घेतले जात आहे. या माध्यमातून ५५०० डॉक्टर्स उपलब्ध होत आहेत. कोरोनाचा वाढता आकडा पाहता हे मनुष्यबळही अपुरे पडेल. त्यामुळे निष्पाप जीव वाचवण्यासाठी तीन आठवडे कडक टाळेबंदी आवश्यक असल्याची विनंती मुख्यमंत्र्याना करण्यात येत आहे असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.