वीकेंड लॉकडाउन संक्रमण रोखण्यात प्रभावी नाही; केंद्राचा महाराष्ट्राला सल्ला

    मुंबई :  देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब या तीन राज्यात कोरोना थैमान घालत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता केंद्र सरकारने पाऊले उचलायला सुरुवात केली असून या तीन राज्यांत 50 हाय लेव्हल हेल्थ टीम पाठवण्यात आल्या आहेत.

    या प्रत्येक टीममध्ये दोन सदस्य असतील. त्यामध्ये एक इपिडर्मिटोलॉजिस्ट आणि एक आरोग्य तज्ज्ञाचा समावेश असेल. या टीम महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यातील स्थानिक आरोग्य व्यवस्थेशी समन्वय साधणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कोरोना काळात घ्यावयाच्या खबरदारी, उपलब्ध सुविधा, टेस्टिंग आणि इतर गोष्टींबद्दलही मार्गदर्शन करणार आहेत.

    कोरोना रोखण्यास आठवड्याच्या शेवटी दोन दिवस असणाऱ्या लॉकडाऊनची फार मदत होणार नसल्याचा सल्ला महाराष्ट्राला केंद्राने दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या सचिवांना दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीत याबद्दल सूचना केल्याची माहिती आता समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी एका बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबद्दल सूचना केल्या होत्या.

    भूषण यांनी त्यावेळी कुंटे यांना पत्रही पाठवले होते. ज्यात लॉकडाउन न लावता कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्याची सूचना केली होती. नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन यासारखे उपाय संक्रमण रोखण्यात फार प्रभावी नाहीत. त्याऐवजी जिल्हा पातळीवरील प्रशासनाने कंटेनमेंट उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर द्यायला हवा, असे भूषण यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.