दीड वर्षानंतर सुरु झालेल्या शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मुलांचे स्वागत, कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना

सोशल डिस्टन्सिंग राखता यावे यासाठी विद्यार्थ्यांना टप्प्याटप्यात बोलावण्यात येणार असून, काही शाळांनी तीन तासांचे नियोजन केले आहे. पहिल्या आठवड्यात वर्गात प्रत्यक्ष अभ्यास होणार  नाही, विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

  मुंबई – तब्बल दीड वर्षांनंतर बंद असलेल्या शाळा सोमवारपासून पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजल्या आहेत. कोरोनाचे नियम पाळून शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी फुले आणि पेढे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन पालक व विद्यार्थांना शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

  कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने राज्य सरकारने सोमवारपासून ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी व शहरी भागातील ८ वी ते १२ पर्यंतच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तब्बल दीड वर्षानंतर कुलुप बंद असलेल्या शाळा पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनी हजेरी लावली. राज्यभरात  शाळेकडून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शाळेच्या पहिल्या दिवशी फुले आणि पेढे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. दीड वर्षांनंतर  शाळा सुरू होत असल्याने शाळेचा पहिला दिवस हा शाळांमध्ये उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शाळांमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. शाळेत १०० टक्के हजेरीची सक्ती नसून पालकांच्या संमती नंतरच शाळेत प्रवेश दिला जात आहे. शाळांमध्ये प्रत्येक बाकावर एकच विद्यार्थी बसविण्याचे नियोजन शाळा, संस्थाचालकांनी केले असल्याने या शाळा टप्प्याटप्प्याने तीन सत्रात भरविण्याचेही नियोजन शाळांकडून करण्यात आले आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत शाळा सुरू ठेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या प्रत्येक मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाणार असून त्यासाठी शाळांना सूचनाही देण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

  दीड वर्षांपासून विद्यार्थी शाळेपासून दूर होते. आज विद्यार्थ्यांची शाळा सुरू होऊन त्याच्या ऑफलाईन अभ्यासाला सुरुवात होत आहे. ज्ञानमंदिरात पुन्हा विद्यार्थ्यांना पाहून आनंद होत असल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे.

  विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांनी देखील शासनाच्या निर्णयाचे स्वागत करुन मुलांना शाळेत पाठवल्याचे चित्र दिसत आहे. मुले शाळेत गेल्याचा आनंद पालकांच्याही चेहऱ्यावर दिसतो आहे. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थीही खुश आहेत. ऑनलाईन अभ्यासापासून सुटका झाली, आता शाळेत अभ्यास करायला मिळेल त्यामुळे खूप आनंद होत असल्याचे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.

  सोशल डिस्टन्सिंग राखता यावे यासाठी विद्यार्थ्यांना टप्प्याटप्यात बोलावण्यात येणार असून, काही शाळांनी तीन तासांचे नियोजन केले आहे. पहिल्या आठवड्यात वर्गात प्रत्यक्ष अभ्यास होणार  नाही, विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

  असे आहेत नियम –

  – आपले दप्तर भरताना शालेय वस्तूंसोबतच सॅनिटायझरची बाटली जरुर भरा

  – शाळेत जाण्यासाठी तयार होताना तोंडावर मास्क घालणे विसरू नका

  – शाळा घराजवळ असेल तर चालत किंवा सायकलने जा

  – बसने जाता एका सीटवर एकाच विद्यार्थ्याने बसा, पूर्ण वेळ मास्क वापरा

  – शाळेत प्रवेश करताना आणि शाळा सुटताना शारीरिक अंतर पाळा

  – शाळेत येताना शाळेतील कर्मचा-यांना विद्यार्थ्यांचे तापमान मोजू द्या

  – वर्गात प्रवेश करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझरने निर्जंतुक करा

  – नेमलेल्या बाकांवरतीच बसा, मित्रांसोबत जागेची अदलाबदल करू नका

  – विद्यार्थ्यांनी २ मीटरचे अंतर राखणे गरजेचे.

  – शाळेच्या परिसरात कोणतेही खेळ खेळण्यास परवानगी नाही.

  – विद्यार्थ्यांना आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे नेण्याची व्यवस्था करणे.