Western Railway coaches become ‘isolation centers’; 128 coaches available in Mumbai Mandal and 21 centers ready at Palghar station

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता आता पश्चिम रेल्वेने आपले कोच कोविड सेंटरमध्ये रुपांतरित केले आहेत. पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये आयसोलेशन कोच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या पालघर, नंदुरबार, गुजरातमध्ये साबरमती आणि चांदलोडिया स्थानकांवर आणि मध्य प्रदेशच्या इंदोरजवळील स्थानकावर राज्य सरकारच्या मागणीनुसार आयसोलेशन कोच उभारण्यात आले आहेत.

    मुंबई : कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता आता पश्चिम रेल्वेने आपले कोच कोविड सेंटरमध्ये रुपांतरित केले आहेत. पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये आयसोलेशन कोच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या पालघर, नंदुरबार, गुजरातमध्ये साबरमती आणि चांदलोडिया स्थानकांवर आणि मध्य प्रदेशच्या इंदोरजवळील स्थानकावर राज्य सरकारच्या मागणीनुसार आयसोलेशन कोच उभारण्यात आले आहेत.

    पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेद्वारे एकूण ३८६ आयसोलेशन कोच तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई मंडळात १२८ कोच उपलब्ध आहेत. जिल्हा प्रशासनाच्या मागणीवर २१ कोचचा एक रेक मुंबईजवहील पालघर रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक ३ वर ठेवला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनीही या कोचची पाहणी केली आहे.

    यापूर्वी १८ एप्रिलला नंदुरबार रेल्वेस्थानकावर कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी २१ आयसोलेशन कोच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ४ मे पर्यंत नंदुरबारमध्ये एकूण ९७ रुग्णांना या आयसोलेशन केंद्रात भरती केले असून त्यापैकी ६६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या कोचमध्ये ३१ रुग्ण उपचार घेत आहेत. रतलाम मंडळांतर्गत मध्य प्रदेशच्या इंदौरजवळही ३० एप्रिलपासून टीही रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर २० आयसोलेशन कोच उपलब्ध करून देण्यात आले. ४ मे रोजी टीहीमध्ये १५ रुग्ण दाखल होते.

    पालघरमध्ये तयार केलेल्या २१ आयसोलेशन कोचच्या रेकमध्ये ३७८ रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक कोचमध्ये ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहे. कोचच्या दोन्ही साईडला खिडक्यांना मच्छरदानीने कव्हर केेले आहे. प्रत्येक रुग्णांसाठी बेडरोल आणि डस्टबिन उपलब्ध आहेत. प्रत्येक कोचमध्येे एक बाथरूम तसेच तीन शौचालये उपलब्ध आहेत. तसेच कोचमध्ये पाणी गरम करण्याचीही व्यवस्था आहे.

    सध्या उन्हाळ्याचे दिवस पाहता आतील तापमान कमी ठेवण्यासाठी कोचच्या छतावर ज्यूटच्या कपड्याने आच्छादीत केले आहे आणि कूलर देखील लावला आहे. काेविड रुग्णांची देखभाल करणाऱ्या डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफसाठी वेगळी व्यवस्था आहे. रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशावर रेल्वेने विविध ठिकाणांवर ४ हजार कोविड देखभाल कोच उपलब्ध करून दिले आहेत. याची एकूण क्षमता ६४ हजार खाटांची आहे. हे आयसोलेशन कोच सहज स्थलांतरित करता येऊ शकणारे आहेत.