नारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

‘मातोश्री’ शिवाय एकनाथ शिंदे एक सहीदेखील करु शकत नाहीत. ते जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना आमच्यात घेऊ. आम्ही मनात आणलं तर लवकरच या सरकारचं आम्ही विसर्जन करु, असा दावाही यावेळी नारायण राणे यांनी केला आहे. दरम्यान यावर शिवसेना नेत एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी कंटाळलो व लवकरच निर्णय घेणार’, हा ‘जावईशोध’ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला हे त्यांचे त्यांनाच माहित असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

    मुंबई : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा सुरु आहे. या जन आशिर्वाद यात्रे दरम्यान नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. ‘एकनाथ शिंदे हे फक्त सही पुरतेच मंत्री राहिलेत. आता ते शिवसेनमध्ये कंटाळले आहेत. त्यांना आम्ही आमच्यात घेऊ’, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ‘मातोश्री’ शिवाय एकनाथ शिंदे एक सहीदेखील करु शकत नाहीत. ते जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना आमच्यात घेऊ. आम्ही मनात आणलं तर लवकरच या सरकारचं आम्ही विसर्जन करु, असा दावाही यावेळी नारायण राणे यांनी केला आहे.

    दरम्यान यावर शिवसेना नेत एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी कंटाळलो व लवकरच निर्णय घेणार’, हा ‘जावईशोध’ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला हे त्यांचे त्यांनाच माहित असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आता एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही, असा दावा त्यांनी केला.

    माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी

    ‘मी निष्ठावान शिवसैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे. पक्षाने मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडणे एवढेच मला माहित आहे. स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे हे माझ्या रक्तात नाही. नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर जबाबदारी सोपविल्यापासून आजपर्यंत कधीही त्यांनी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला नाही. त्यांच्याच पाठबळामुळे नगरविकास विभागात अनेक चांगले निर्णय घेता आले. नारायण राणे हे आता केंद्रीय मंत्री असून त्यांच्या खात्याचे धोरणात्मक निर्णय हे पंतप्रधानांच्या संमतीशिवाय नक्कीच मंजूर होत नसावेत’, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.