ajit pawar

पुरवणी मागण्यात शेतकर्‍यांच्या मदतीसह इतर अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. अवकाळी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पीक नुकसानीसाठी मदत म्हणून २ हजार २११ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. तर, धान उत्पादकांना बोनस देण्यासाठी २ हजार ८५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई :  या दोन दिवशीय अधिवेशनातील कामकाजावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. अधिवेशनाच्या नावावर महाविकास आघाडी सरकारने शतेकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. विरोधकांच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

शेतकऱ्यांना या सरकारने कोणतीही मदत केलेली नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांना मदत करण्याविषयीची भूमिका या सरकारने घेतली होती. मात्र, या भूमिकेचा सरकारला विसर पडला आहे. हे अधिवेशन घेण्यामागे फक्त आटपून टाकायचे हीच भूमिका दिसून आली. शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही जे प्रश्न विचारले त्याची उत्तरे आम्हाला मिळू शकलेली नाहीत असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

कोरोना संकटाबरोबरच राज्यावर चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूरस्थिती अशी अनेक नैसर्गिक संकटे आली. या संकटातील बाधितांसाठी केंद्राच्या निकषापेक्षा अधिकची मदत राज्य सरकारने केली असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

अजित पवारांचे विरोधकांना उत्तर

मदत करताना सर्वांना समान मदत केली आहे. कोणत्याही प्रकारचा प्रादेशिक अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटीबध्द आहे. कोरोना संकटाच्या काळातही आपण कर्जमुक्तीचे काम सुरु ठेवले आहे. नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना तसेच दोन लाखांच्यावरील कर्ज एकरकमी फेडणार्‍या शेतकर्‍यांनाही प्रोत्साहनपर मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोरोनाचे संकट गेल्यानंतर याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

शेतकर्‍यांसाठी भरीव तरतूद

पुरवणी मागण्यात शेतकर्‍यांच्या मदतीसह इतर अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. अवकाळी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पीक नुकसानीसाठी मदत म्हणून २ हजार २११ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. तर, धान उत्पादकांना बोनस देण्यासाठी २ हजार ८५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.