देशमुखांच्या वाटमारीत भागीदारी किती ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना भाजपाचा थेट सवाल

ईडीने देशमुख यांचे स्वीय सहायक आणि स्वीय सचिव अशा दोघांनाही अटक केली आहे तर देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. देशमुख यांनी गृहमंत्रिपदावर असताना सचिन वाझे याला दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असून सीबीआय आणि ईडी या तपास यंत्रणांच्या मार्फत चौकशी करण्यात येत आहे. आता ईडी देशमुख यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्याच्या विचारात आहे, असे ईडीतील सूत्रांचे म्हणणे आहे.

    मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंगप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील फास चांगलाच आवळला आहे. याप्रकरणी ईडीने पाचवेळा समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेचे कारण देत देशमुख यांनी चौकशी तूर्त टाळली असली तरी देशमुख यांच्यावरील अटकेची टांगती तलवार मात्र कायम आहे. अशातच, भाजपाकडून महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही लक्ष्य केले आहे.

    देशमुख यांच्या वाटमारीत मुख्यमंत्री (Chief Minister Uddhav Thackeray)  आणि शरद पवारांची (Sharad Pawar ) कितपत भागीदारी होती, याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. भातखळकर यांनी याआधीही याप्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    आमदार भातखळकर यांनी एकीकडे, देशमुख यांच्या वसुलीप्रकरणावरून मुख्यमंत्री आणि पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे भाजपा नेते नारायण राणे यांनीदेखील महाविकास आघाडी सरकार वसुलीबाज असल्याचा आरोप केला आहे. भातखळकर आणि राणे यांच्या आरोपाला महाविकास आघाडीकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. एकंदरीत, वसुलीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे.

    भाजपा नेते महाविकास आघाडीवर वसुलीचा आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकार शासनाचा जो महसूल आहे तो वसूल करत आहे. पण भाजपचे सरकार होते तेव्हा होत असलेल्या वसुलीची आता या नेत्यांना आठवण येत असेल. दिल्लीतील मोदी सरकारला आता जनता कंटाळली आहे. म्हणूनच भाजप जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचे काम करत आहे.

    - अब्दुल सत्तार, राज्यमंत्री