मुख्यमंत्री उद्या कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत? भाजप नेते नितेश राणेचा सवाल

मुख्यमंत्र्यांकडून आमच्या जास्त अपेक्षा नाहीत. निसर्ग चक्रीवादळाचे पैसे मिळाले नाहीत तर आता काय देणार ते? उद्याचा त्यांचा दौरा फोटोसेशनसाठी आहे. फोटोग्राफरने फोटो काढायचे असतात, स्वतःचे फोटो काढून घ्यायचे नसतात…जर ते फोटो काढून घेण्यासाठी येत असतील ते काम त्यांनी घरी बसूनच करावे…इथे यायची गरज काय ? इथे येतच असाल तर राज्याच्या जनतेच्या दिलाशासाठी पॅकेज जाहीर करतात

    कणकवली: मुख्यमंत्री उद्या कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत, असा सवाल भाजप नेते नितेश राणे यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा कोकणातील वस्तुस्थिती सरकारपुढे मांडण्यासाठी आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने काहीही साध्य होणार नाही, असे भाकीत भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

    एवढी हिंमत तुमच्यात आहे का?

    खास शैलीत बोलताना राणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरचा कोकण दौरा म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळे कसे छान सुंदर आहे हे दाखवले जाते आणि तोंड धुतल्यावर सगळे निघून जाते, तसा हा प्रकार असल्याची टीका राणे यांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सर्व कारभार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्यावा. मग आम्ही किती मदत आणून दाखवतो, ते बघा. एवढी हिंमत तुमच्यात आहे का? मनगटात हिम्मत असावी लागते. नुसता टोप घालून कुणी हिरो होत नाही, सरकारमध्ये वजन लागते. तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, मदत आणून दाखवा, असे आव्हान त्यांनी कोकणातील मंत्र्याना दिले.

    काय दिवे लावणार आहेत

    आ.राणे म्हणाले की, गेल्या निसर्ग चक्रीवादळ तुलनेत प्रचंड नुकसान सिंधुदुर्गाचे झाले आहे. महाविकास आघाडीसरकारकडून अपेक्षा कशा ठेवणार ? मागचा अनुभव फार वाईट आहे. निसर्ग चक्रवादळाचे पैसे मिळाले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती घेतली ८ कोटी पैकीं फक्त ४९ लाख मिळाले. मुख्यमंत्री पंचनामे करण्याचे आदेश देतात मग ते पंचनामे रद्दी भरण्यासाठी ठेवले आहेत का? अधिकारी पर्यटनासाठी गावागावात फिरतात का ? मुख्यमंत्री उद्या कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

    फोटोग्राफरने फोटो काढायचे असतात

    ते म्हणाले की, या मुख्यमंत्र्यांकडून आमच्या जास्त अपेक्षा नाहीत. निसर्ग चक्रीवादळाचे पैसे मिळाले नाहीत तर आता काय देणार ते? उद्याचा त्यांचा दौरा फोटोसेशनसाठी आहे. फोटोग्राफरने फोटो काढायचे असतात, स्वतःचे फोटो काढून घ्यायचे नसतात…जर ते फोटो काढून घेण्यासाठी येत असतील ते काम त्यांनी घरी बसूनच करावे…इथे यायची गरज काय ? इथे येतच असाल तर राज्याच्या जनतेच्या दिलाशासाठी पॅकेज जाहीर करतात..निसर्ग चक्तीवादळाची, तौक्ते चक्रीवादळाची मदत द्या अश्या शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल केला. केंद्रात आमचे सरकार आहे. आम्ही सर्व महिती सरकारला दिली आहे. आमचे मुख्यमंत्री कमी पडले असले तरी नरेंद्र मोदी साहेबांकडून भरपूर मदत मिळेल याचा विश्वास असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.