जे केंद्र आणि अन्य राज्याना जमले नाही… ते फक्त महाराष्ट्रात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या दमदार कर्तव्यामुळेच शक्य; वर्धापनदिनी सामनातून मुख्यमंत्र्याचे कौतूक

'शिवसेना ही अशी धोपटमार्गी आणि रोखठोक असल्याने जनतेच्या दिलावर ती ५५ वर्षे राज्य करीत आहे. शिवसेना हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सवही साजरा करीलच करील. शिवसेनेची घोडदौड सुरूच राहील,' असा ठाम विश्वास सामाना मध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

  मुंबई : शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेची भूमिका आणि पुढील वाटचालीवर भाष्य करण्यात आले आहे. त्याचेवेळी विरोधकाना ठाकरी शैलीत इशाराही देण्यात आला आहे. ‘शिवसेना ही अशी धोपटमार्गी आणि रोखठोक असल्याने जनतेच्या दिलावर ती ५५ वर्षे राज्य करीत आहे. शिवसेना हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सवही साजरा करीलच करील. शिवसेनेची घोडदौड सुरूच राहील,’ असा ठाम विश्वास सामाना मध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

  बदनामीच्या चक्रातून महाराष्ट्र लांब राहिला

  सामना ने म्हटले आहे की, ‘महाराष्ट्राने अनेक संकटे छाताडावर घेतली. अनेक लढाया पचवल्या. राजकीय, सामाजिक लढ्यांत असंख्य बलिदानेही दिली, पण कोरोनाची पहिली लाट, मग दुसरी लाट, आता म्हणे तिसरी लाटही दारावर धडका देत आहे. या लाटांनी आम्ही सगळय़ांनीच आपले आप्तस्वकीय, मित्रपरिवारांतले जवळचे लोक गमावले. त्या सगळ्या संकटांवर आणि मृत्यूच्या तांडवावर महाराष्ट्राने जितक्या लवकर नियंत्रण मिळवले तेवढे ना केंद्राला जमले, ना इतर राज्यांना करता आले. गंगेत तरंगणारी प्रेते, गुजरातेत स्मशानाबाहेरील अॅम्ब्युलन्सच्या रांगा, सामुदायिक चिता यांचे फोटो जगभरात गेले. देशाची प्रचंड मानहानी झाली. पण या बदनामीच्या चक्रातून महाराष्ट्र लांब राहिला. तो फक्त महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री दमदारपणे कर्तव्य बजावत असल्यामुळेच,’ असे सामना मध्ये म्हटले आहे.

  सत्तेचा ऊतमात शिवसेनेला नाही

  महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेची सत्ता आहे. पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना चढला, ना आमच्या लाखो कडवट शिवसैनिकांना. पण कोणी विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर हर हर महादेवचा गजर करत तिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत,’ अश्या शब्दांत सामनातून विरोधकांना सूचक इशारा देण्यात आला आहे.

  मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारू!

  ‘शिवसेना स्थापन करतानाच शिवतीर्थावरील पहिल्याच विराट सभेत शिवसेनाप्रमुखांनी एक मंत्र दिला, तोच महाराष्ट्राचा भक्कम पाया आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, ‘मराठा-मराठेतर, शहाण्णव कुळी-ब्याण्णव कुळी, घाटी-कोकणी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य हे वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारू!’ या एकजुटीच्या वज्रमुठीतच शिवसेनेच्या ५५ वर्षांचे सार सामावलेले आहे. शिवसेनेचे मराठीपण जसे तळपणाऱ्या तेजासारखे आहे तसेच हिंदुत्वाचे कवचही बुलंद आहे. शिवसेनेने आपले रंग सरडय़ासारखे बदलले नाहीत. कष्टकरी, शेतकरी, नोकरदारवर्गाने शिवसेनेला भरभरून पाठबळ दिले ते याच सचोटीच्या राजकारणामुळे,’ असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

  वर्धापन दिनाचा सोहळा साधेपणाने

  दरम्यान, यंदाही सलग दुसऱ्या वर्षी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी शिवसेनेचे अनेक महत्वाचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकारी यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. राज्यात कोरोनाचे संकट पूर्णपणे ओसरलेले नाही. त्यामुळे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे. सलग दुस-या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. त्यामुळे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे.

  शाखांवर भगवा ध्वज फडकवून मानवंदना

  महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील हा दुसरा वर्धापन दिन आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, जनजागृतीचे कार्यक्रम आणि अन्य समाजोपयोगी उपक्रम ठिकठिकाणी राबवले जात आहेत. शिवसेनेची प्रत्येक शाखा आणि मध्यवर्ती कार्यालयात निवडक शिवसैनिकांच्या उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता भगवा ध्वज फडकवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात यावी. मात्र शिवसैनिकांनी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून वर्धापन दिन साजरा करावा, अशी सूचना शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.