hasan mushrif

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जनतेशी संवाद साधताना गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

    मुंबई: राज्यात ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेला यश मिळाले आणि पहिल्या लाटेत कोरोना रोखता आला. त्या नतंर दुसऱ्या लाटेत ‘मी जबाबदार’ या योजनेतून सरकारने लोकांना या कामात सहकार्यासाठी प्रोत्साहित केले होते. आता कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘गाव करील ते राव काय करील’ या धर्तीवर उपाय योजना कराव्या असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत आहे.

    विशेष योजनेतून विकास निधीची मदत
    कोरोना उपाययोजना करत रूग्ण संख्या आटोक्यात ठेवून उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना ५०, २५, आणि १५ लाख रूपयांचा विकास निधी लेखाशिर्ष २५ -१५, २०- ५४ या विकास निधीमधून देण्यात येणार आहे. या करीता काही निकष ठरविण्यात आले आहेत, त्यासाठी ५० गुण दिले जाणार आहेत.

    सहा विभागात योजना लागू
    ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल. प्रत्येक गावाने हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि अन्य काही सरपंचानी त्यांच्या गावात कोरोना वेशीवरच रोखला होता. त्यांच्याशी चर्चा करून सहा विभागात ही योजना आणि निकष ठरविण्यात आले असून तीन बक्षीसे देण्यात येणार आहेत.

    मुख्यमंत्र्यानी त्यांच्या फेसबूक लाईव्हमध्ये सांगितले होते की प्रत्येक सरपंचाने आपल्या गावात कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न केले तर आपण या लढ्यात विजयी होणार आहोत. त्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येत असल्याचे मुश्रीफ म्हणाले. स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय आज जारी करण्यात येत आहे.

    “कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष पंचवीस – पंधरा (२५१५) व तीस-चोहोपन (३०५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहे” : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

    ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ