pankaja munde

शिवसेनेची या सहामध्ये एकही जागा आली नसली तरी भाजपला जोरदार धक्का देण्याचा त्यांच्या मनसुबा पूर्ण झाला आहे. विधान परिषदेत कॉंग्रेस राष्ट्रवादीचे संख्याबळ सातत्याने कमी करत भाजपसेना युतीने सत्ता नसतानाच्या काळातही वरचष्मा ठेवला होता.

  •  प्रमुख नेते मात्र माध्यमांपासून दूर!

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या कोअर समितीची बैठक ( BJP core committee meeting)  आज मुंबईत झाली, या बैठकीत विधानपरिषदेच्या सहा जागांवरील परिणामांबाबत सखोल चर्चा करण्यात आल्याची माहिती भाजपातील सूत्रांनी दिली आहे. या बैठकीनंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांनी माध्यमांसमोर येण्याचे टाळले तर माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मात्र हार किंवा जीत जे काही असते त्याची जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाची असते. त्यामुळे जे काही परिणाम आले आहेत त्यातील चुका दुरुस्त करून पक्ष भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या  कोअर समिती बैठकीला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकजामुंडे, विनोद तावडे यांच्या सह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हजर होते. या बैठकीनंतर पक्षाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी या पराभवाची जबाबदारी स्विकारताना तीन पक्षांसमोर भाजपची हार हेणे अपेक्षितच होते अशी भावना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केल्याचे समजते. तर शिवसेनेच्या आत्मघातकी राजकारणामुळे भाजपला नुकसान होत असल्याचा निष्कर्ष विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी बैठकीत केलेल्या निवेदनातून समोर आल्याचे या सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेची या सहामध्ये एकही जागा आली नसली तरी भाजपला जोरदार धक्का देण्याचा त्यांच्या मनसुबा पूर्ण झाला आहे. विधान परिषदेत कॉंग्रेस राष्ट्रवादीचे संख्याबळ सातत्याने कमी करत भाजपसेना युतीने सत्ता नसतानाच्या काळातही वरचष्मा ठेवला होता. मात्र आता शिवसेनेच्या आत्मघातकी राजकारणामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही त्याच्या पदरी काहीच पडले नाही आणि दोन्ही काँग्रेसने आपले संख्याबळ वाढविण्यात यश मिळवल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान भाजपने या बाबत येत्या काळात चिंतन करण्यासाठी पक्षाच्या आमदारांची बैठक घेण्याचे ठरविले असून लवकरच त्याबाबत तारीख आणि वेळ ठरविण्यात येणार आहे असे या सूत्रांनी सांगितले. या बैठकीत पराभवाचे विश्लेषण करण्यात येणार असून कच्चे दुवे कोणते ते शोधले जाणार आहे, असे या सूत्रांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे दररोज कोणत्या नी कोणत्या विषयावर ठाकरे सरकारला भंडावून सोडणारे प्रश्न विचारणारे भाजपचे सर्व प्रवक्ते आजअचानक गायब  झाले असून या निकालांवर पक्षाकडून अधिकृत कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही.