सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचे नियम शिथील, अमंलबजावणी नेमकी कधी होणार ? : वाचा सविस्तर

केंद्र सरकारने दागिन्यांच्या खरेदी विक्रीच्या नवीन यंत्रणेसाठी 15 जूनपासून एक समिती स्थापन केली आहे. ही समिती हॉलमार्किंगशी संबंधित समस्यांवर काम करणार आहे. दरम्यान वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी देशातील सोन्याचे दागिने विक्रीच्या नव्या यंत्रणेसंदर्भातील आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील ग्राहकांनी सोने खरेदी करताना हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांची खरेदी करावी. याबाबत कोणतीही दिरंगाई करु नये.

  मुंबई : केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचे नियम शिथील करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार देशभरात येत्या 1 जूनपासून नव्हे तर 15 जूनपासून हॉलमार्किंग चे नियम लागू केले जाणार आहेत. म्हणजे येत्या 15 जूनपासून देशात केवळ हॉलमार्कचे दागिन्यांची विक्री करण्यास परवानगी असणार आहे. देशभरातील कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता सरकारने या अंमलबजावणीची तारीख वाढवली आहे.

  हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय ?

  सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटलं जाते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे केले जाते. जर दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते. BIS चा हॉलमार्क हा सोन्यासह चांदीच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण दर्शवतो. कोणत्याही दागिन्यांवर BIS चिन्ह असणे म्हणजे ते भारतीय मानक ब्यूरोच्या मानदंडांवर योग्य असल्याचे समजले जाते. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी, दागिन्यांवर BIS चा हॉलमार्क आहे की नाही, याची खात्री करा. जर त्यावर हा हॉलमार्क असेल तर ते सोनं शुद्ध आहे. मात्र अनेकदा काही ज्वेलर्स तपास न करता हॉलमार्किंग करतात. त्यामुळे तो हॉलमार्क खरा आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) मूळ हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील त्यावर असतो.

  ग्राहकांची फसवणूक होणार नाही

  हॉलमार्क अनिवार्य झाल्यानंतर देशभरातील दागिन्यांच्या बाजारपेठेत केवळ हॉलमार्क असलेले 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातील. यामुळं ग्राहकांची फसवणूक टळेल. त्यांना शुद्ध सोन्याचे दागिने मिळतील. हॉलमार्किंगमध्ये BIS चं चिन्हं, कॅरेटबाबत माहिती, दागिना केव्हा बनला त्याचं वर्ष, सराफाचं नाव असेल. BIS हॉलमार्किंग आंतरराष्ट्रीय मापकांशी जोडण्यात आलं आहे. यामुळे सोने व्यापारात पारदर्शकता वाढेल.

  हॉलमार्किंग संदर्भातील नवे नियम

  केंद्र सरकारने दागिन्यांच्या खरेदी विक्रीच्या नवीन यंत्रणेसाठी 15 जूनपासून एक समिती स्थापन केली आहे. ही समिती हॉलमार्किंगशी संबंधित समस्यांवर काम करणार आहे. दरम्यान वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी देशातील सोन्याचे दागिने विक्रीच्या नव्या यंत्रणेसंदर्भातील आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील ग्राहकांनी सोने खरेदी करताना हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांची खरेदी करावी. याबाबत कोणतीही दिरंगाई करु नये.

  दरम्यान हॉलमार्किंगची अंमलबजावणी करण्याची तारीख देशभरात अनेकदा वाढवण्यात आली आहे. येत्या जानेवारीपासूनच हॉलमार्किंगचा नियम अमलात येणार होता. मात्र कोरोनामुळे यात वाढ करत ते 1 जूनपर्यंत करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा या मुदतीत वाढ करत ती 15 जून करण्यात आली आहे.

  ग्राहकांना फायदा

  तज्ज्ञांचे दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या या निर्णयानंतर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. अनेकदा देशात बर्‍याच भागात 22 कॅरेटऐवजी 21 कॅरेट सोने ग्राहकांना विकलं जातं होते. मात्र या दागिन्यांची किंमत 22 कॅरेट किंवा 24 कॅरेटनुसारच आकारली जात होती. हॉलमार्किंगच्या नियमामुळे ही फसवणूक थांबेल. तसेच जर योग्य हॉलमार्क योग्य नसेल तर प्रथम ज्वेलर्सला नोटीस बजावली जाईल. विशेष म्हणजे हॉलमार्किंगसाठी ज्वेलर्सला परवाना घेणं आवश्यक आहे.

  तसेचं हॉलमार्किंगचा नियम लागू झाल्यानंतर तुमच्याकडे असलेल्या जुन्या दागिन्यांचे तुम्ही हॉलमार्किंग करू शकता. तुम्ही कोणत्याही हॉलमार्किंग सेंटरवर दागिन्यांचे हॉलमार्क करता येईल. पण जुन्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील. शिवाय हॉलमार्किंग नसणारे दागिने विकल्यास तुम्हाला पैसे कमी मिळतील.