पेट्रोल दरवाढीवर आंदोलनं करणारे भाजपा नेते आता कुठे लपले?; बाळासाहेब थोरात यांचा सवाल

एक रुपया इंधन दरवाढ झाली की, त्यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलने करणारे भाजपाचे नेते कार्यकर्ते आता लपलेत कुठे?” असा सवाल महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपावर टीका केली. आता या नेत्यांना शोधायला हवे असेही ते म्हणाले.

    मुंबई : मुंबई, पुण्यासह इतर शहरात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. सोमवारपासून पुणे शहरात पेट्रोलचा दर हा शंभरच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आता काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाला सुरूवात केली आहे. इंधन आणि महागाईच्या मुद्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं जात आहे. त्यानंतर आता राज्यातील काँग्रेस नेते देखील आक्रमक झाले आहेत.

    ”सध्या पेट्रोलचा दर शंभर रुपयांचा पार गेला आहे. एक रुपया इंधन दरवाढ झाली की, त्यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलने करणारे भाजपाचे नेते कार्यकर्ते आता लपलेत कुठे?” असा सवाल महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपावर टीका केली. आता या नेत्यांना शोधायला हवे असेही ते म्हणाले.

    दरम्यान महाविकास आघाडीने महाराष्ट्रात करोनास्थिती नीट हाताळली. मात्र दुसऱ्या राज्यांमध्ये नदीत मृतदेह तरंगत होते, वाळूतून मृतदेह उघडे पडत होते. ही भारतासाठी लाजिरवाणी बाब आहे. यामुळे जगात भारताची प्रतिमा मलिन झाली आहे. हे केंद्र सरकारचे अपयश आहे, अशी टीका देखील बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली आहे.

    मोदी सरकार अपयशी

    शंभर दिवसांत महागाई कमी करणार होते. मात्र यातील कोणतंही आश्वासन केंद्र सरकारनं पाळलं नसल्यामुळं गेल्या सात वर्षांत हे सरकार अपयशी ठरलं असल्याची वस्तुस्थिती आहे. मोदी सरकार गेल्या 7 वर्षात पुर्णपणे अपयशी ठरलं आहे, असं थोरात म्हणाले आहेत.