मराठा समाज आरक्षण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मराठा समाज आरक्षण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात सध्या आरक्षणाचा विषय संवेदनशील आहे. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. ही लढाई जिंकताना ओबीसी समाज किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षाणाला कणभरही धक्का लावला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठआकरे यांनी विधानसभेत दिली.

मुंबई (Mumbai). राज्यात सध्या आरक्षणाचा विषय संवेदनशील आहे. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. ही लढाई जिंकताना ओबीसी समाज किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षाणाला कणभरही धक्का लावला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभेत दिली.

सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागेल तो लागेल, पण मागील वेळी आपण निर्णय घेतला होता तेव्हा आपण सगळे एकत्र होतो. उच्च न्यायालयात आपण केस जिंकलो, सर्वोच्च न्यायालयात आपण गेलो तेथेही आपण जिंकूच, तीथेही वकीलांची फौज तशीच्या तशी ठेवली आहे, त्यावेळची भूमिका आजही बदललेली नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे वकिलांशी कायम बोलत असतात. संघटनांशीही संवाद सुरू आहे. इतर समाजाचे आरक्षण कमी करणार का अशी चर्चा काही लोकांच्या सडक्या डोक्यातून आली आहे. मी जबाबदारीने सांगत आहे की कोणाचेही आरक्षण कमी करणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरक्षणप्रश्नी होत असेलल्या आरोपांवर मंगळवारी विधानसेभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या आरोपांवर पलटवार केला. पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

तुम्ही आमच्या मानगुटीवर बसायचे ठरवले आहे
माझ्या सहकारी मंत्र्यांनी समर्पक उत्तर दिले आहे, आता तुम्ही आमच्या मानगुटीवर बसायचे ठरवले असेल तर माहित नाही. सर्वानुमते ही लढाई आपण सर्वोच्च न्यायालयाते लढतोय, ही लढाई जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही, ही लढाई जिंकावी अशी माझी प्रार्थना आहे. मराठा समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देताना दुसर्‍या समाजाचे आम्ही एक कणही काढणार नाही.असे मुख्यमंत्री म्हणाले.

फडणवीस दिल्लीत जावेत ही मुनगंटीवार यांची इच्छा
भाजपमध्ये राज्यातील नेतृत्वावरून होत असलेल्या कथित संघर्षावरूनही उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जावेत, अशी सर्वांची इच्छा आहे. सुधीर मुनगंटीवार यांची तर अशी इच्छा आहेच आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. हे अधिवेशन आपण दोन दिवस घेतले, दिल्लीचे तर घेता पण आले नाही, कोरोनाबद्दलचे श्रेय घ्यायची वेळ नाही, पण जे वॉशिंग्टन पोस्टला दिसले, जागतीक आरोग्य संघटनेला दिसले ते तुम्हाला दिसले नाही याची खंत वाटते, आपल्या मुंबईत 17 दिवसात रुग्णालय उभे केले त्याचे कौतुक करणार की नाही? अशा शब्दात त्यांनी यावेळी विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली.

कुंडल्या बघणारे आता पुस्तक वाचायला लागले
ज्या कोणी समाजविघातक शक्ती जातीपातीत संघर्ष आग लावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या आगीवर पाणी टाकावे लागले. आपण टाकले नाही तर राज्यातील जनता पाणी टाकेल. विरोधी पक्षांनी आमचे पुस्तक वाचन केले. आधी कुंडल्या बघत होत्या, कुंडल्या बघणारे आता पुस्तक वाचायला लागले आनंद आहे. मुहुर्त बघत होते आज पडणार उद्या पडणार. कुंडल्या कुणी कुणाच्या बदलू शकत नाही. हे अधिवेशन दोन दिवसांचे घ्यावे लागले. दोन दिवस का घ्यावे लागले तर कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

ईडीचा वापर ही विकृती
महाराष्ट्रात सरकारविरोधात काही बोलले तर तुरुंगात टाकले जाते, महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे असा आरोप आमच्यावर झाला. मग ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातल्या सत्ताधारी भाजपाला विचारला. प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. त्यांच्या मुलांचीही चौकशी केली. नशीब त्यांना नातू झालेला नाही नाहीतर त्याच्याही मागे ईडी चौकशी लावली असती किंवा उद्या सांगतीलही की प्रताप सरनाईकांना नातू झाला तर आधी इथे घेऊन या. हे सगळे काय आहे? ही विकृतीच आहे. असे विकृत राजकारण आम्ही करत नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.