साकीनाका बलात्काराचा तपास करणाऱ्या ज्योत्स्ना रासम कोण आहेत? : जाणून घ्या सविस्तर

“साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. तपास पूर्ण करुन एका महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू,” असं मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं.

  मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील बलात्कार प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम करणार आहेत. तसंच, आतापर्यंतच्या तपासात एकच आरोपी असल्याचं निष्पन्न झाल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं. तसंच, आरोपी मोहन चौहान या नराधमाला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुननावली आहे. हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

  “साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. तपास पूर्ण करुन एका महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू,” असं मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं.

  “साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही.ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेलं आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आरोपपत्र दाखल केलं जाईल,” असं हेमंत नगराळे यांनी सांगितलं.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

  साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

  ज्योत्स्ना रासम कोण आहेत?

  ज्योत्स्ना रासम यांनी आतापर्यंत अनेक महत्वाच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. ज्योत्स्ना रासम यांना खेळाचीही खूप आवड आहे. भ्रूणहत्येच्या विरोधात त्यांनी 11 दिवसांत 13 राज्यांमध्ये 6580 किलोमीटर प्रवास चारचाकी वाहनाने प्रवास केला. यावेळी कमी वेळात सर्वात वेगाने प्रवास करणारी महिला म्हणून त्यांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

  दरम्यान रासम या 27 वर्षांपूर्वी पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर दाखल झाल्या होत्या. आज सहायक आयुक्त म्हणून राज्य गुप्तचर विभागात कार्यरत आहेत. इतक्या वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल यशस्वी केली आहे. ज्योत्स्ना रासम चांगल्या गिर्यारोहक आहेत. त्यांनी अनेक उंच शिखरं आतापर्यंत पादक्रांत केली आहेत. यात 1991 मध्ये हनुमान तिब्बा (19450 फूट), शितीधर (17340 फूट) आणि फ्रेंडशिप (17100 फूट) ही तीन शिखरं यांनी चढली आहेत. रासम यांनी राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ चित्रपटासासाठी राणी ट्रेनिंग दिलं होतं. तेव्हा ज्योत्स्ना या गुन्हे शाखेच्या कक्ष 8 मध्ये कार्यरत होत्या. त्यावेळी राणीला त्यांनी गुन्हेगारी तपासाचे धडे गिरवायला शिवकले.

  ज्योत्स्ना रासम यांचं मूळ गाव राजापूर आहे. पण, त्यांचा जन्म मुंबईत झाला असून इथचं त्यांचं आयुष्य गेलं आहे. वांद्रे येथील गांधीनगर परिसरात रहाणाऱ्या ज्योत्स्ना यांचे न्यू इंग्लिश स्कूल, नंतर चेतना महाविद्यालय इथं शिक्षण झालं. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय, वडील छापखान्यात कामाला होते, तर आई घर सांभाळायची; पण खाण्यापिण्यापासून शिक्षणापर्यंत आईवडिलांनी कधीही आबाळ होऊ दिली नाही, असे त्या सांगतात.