मराठा आंदोलन कुणाच्या विरोधात आहे?; अरविंद सावंतांचा संभाजीराजेंना सवाल

भाजपचा या आंदोलनाला छुपा पाठिंबा असू शकतो. राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे हे आंदोलन केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय की सरकार विरोधात आहे? हे संभाजीराजेंनी स्पष्ट केले पाहिजे- खासदार अरविंद सावंत

    मुंबई: खासदार संभाजी छत्रपती यांनी १६ जून रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना सवाल केला आहे की आंदोलन कुणाच्या विरोधात आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आहे का?

    राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने?
    संभाजीराजेंचा आम्ही आदर करतो. भाजपचा या आंदोलनाला छुपा पाठिंबा असू शकतो. राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे हे आंदोलन केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय की सरकार विरोधात आहे? हे संभाजीराजेंनी स्पष्ट केले पाहिजे. खा. संभाजी छत्रपती यांनी किल्ले रायगडावरून येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याची हाक दिली. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीराजे भाजपचे खासदार आहेत. कोणाविरुद्ध लढतो? कशासाठी लढतोय? हे त्यांनी ठरवले पाहिजे. सरकार तुमच्याबरोबर आहे. न्यायिक लढाई लढण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. कोणीतरी काढा दिल्यानंतर तुमचा आवाज विरोधात दिसत आहे का?, असा सवाल सावंत यांनी केला आहे.

    झाडांच्या कत्तली करणारांना काय अधिकार? 
    पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना भाजपकडून लक्ष्य केले जात आहे. त्यावरूनही त्यांनी विरोधकांवर टिका केली. ते म्हणाले की, सबंध पर्यावरण चळवळीचे प्रणेते आदित्य ठाकरे हे मंत्री नव्हते, तेव्हा त्यांनी सागरी किनारा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यांच्या प्रयत्नामुळे राज्य सरकारला प्लास्टिक बंदीचा कायदा करावा लागला. ठाकरे घराणे निसर्गप्रेमी आहे. ज्यांनी अंधाऱ्या रात्री गोरेगावात झाडांच्या कत्तली केल्या त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे?, असा सवालही त्यांनी केला.