“शेतकऱ्यांची डोकी फोडणाऱ्या हरियाणात राष्ट्रपती राजवटीची मागणी आता कोण करणार” सामनातून भाजपवर ताशेरे

  हरयाणात शेतकरी आंदोलनाला पुन्हा धार चढली आहे. करनालच्या घरौंडा येथील टोलनाक्यावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या प्रकरणावरुन सामनातून भाजपवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

  काय म्हटलंय सामनात?

  अमृतसरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा सुरू असतानाच अगदी बाजूला हरयाणामध्ये शेतकऱयांचे दुसरे ‘जालियनवाला बाग’ घडत होते, पण ना दिल्लीचे सरकार जागचे हलले ना महाराष्ट्रातील ‘जन आशीर्वाद’ यात्रेला हुंदका फुटला. एक मात्र नक्की, सरकार ज्या निर्घृणतेची बीजे पेरत आहे त्याला कटू फळे आल्याशिवाय राहणार नाहीत. देशातील शेतकऱयांनी उठाव करावा व बळीराजाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घ्यावा असे हे प्रकरण आहे. हरयाणातील ‘खट्टर’ सरकारला सत्तेवर राहण्याचा थोडाही अधिकार नाही, पण ‘‘शेतकऱयांच्या रक्ताचे पाट वाहिले म्हणून खट्टर सरकारला जन आशीर्वादाचा अभिषेक लाभला’’ असे सांगायलाही हे लोक कमी करणार नाहीत.

  आता हरियाणात राष्ट्रपती राजवट लावण्याची कोणी मागणी करणार का?

  अफगाणिस्तानात तालिबानी ज्या पद्धतीचा हिंसाचार घडवून माणसे मारीत आहेत, त्याच तालिबानी पद्धतीने हरयाणाच्या भाजप सरकारने शेकडो शेतकऱयांची डोकी फोडून भारतमातेची भूमी रक्ताने भिजवली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना हा रक्तपात झाला. सरकारने शेतकऱयांना खतमच केले. ‘‘शेतकऱयांची डोकी फोडणारे हरयाणा सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावा’’ अशी मागणी आता कोणी करणार आहे काय?

  मोदी सरकारातील एक केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी देतो. त्याबद्दल त्याच्यावर ‘सूक्ष्म’ कायदेशीर कारवाई होताच ‘‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा हो।’’ अशा बोंबा ठोकणारे हेच लोक हरयाणातील रक्तबंबाळ शेतकऱयांचे चित्र पाहून गप्प आहेत. कोण हा उपजिल्हाधिकारी आयुष सिन्हा? शेतकऱयांची डोकी फोडा, असा बेगुमानपणे आदेश देतोय. हा अधिकारी क्षणभरही नागरी सेवेत राहता कामा नये.

  नेमकं प्रकरण काय?

  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करनालमध्ये भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह भाजपाचे ६ खासदार, ६ राज्यसभा खासदार, १२ आमदार, माजी आमदार आणि लोकसभा, विधानसभा लढलेले उमेदवारांसह संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला आले होते. यावेळी विरोध दर्शवण्यासाठी शेतकरी बसताडा टोल नाक्यावर ठिय्या मांडून बसले होते. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.