दिल्लीत सुटणाऱ्या प्रश्नासाठी गल्लीत आदळआपट का? अमोल कोल्हेंचा भाजप नेत्यांना सवाल

महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, सांस्कृतिक वारसा, आंतरराष्ट्रीय पर्यटन व देशी गोवंशाचे संवर्धन या दृष्टीने महत्त्वाचा घटक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी हीच आमची भूमिका असून त्यासाठी माझा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

    मुंबई : बैलगाडा शर्यतीच्या आयोजनावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होणारच अशी ठाम भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडाळकर यांनी मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe ) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत सुटणाऱ्या प्रश्नासाठी गल्लीत आदळआपट का? असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केला आहे.

    महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, सांस्कृतिक वारसा, आंतरराष्ट्रीय पर्यटन व देशी गोवंशाचे संवर्धन या दृष्टीने महत्त्वाचा घटक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी हीच आमची भूमिका असून त्यासाठी माझा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

    बैलगाडा शर्यतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह राज्य सरकारमधील सर्व घटकपक्षांची भूमिका आणि त्यावरील बंदी उठवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती खासदार कोल्हे यांनी माध्यमांसमोर मांडली. बैल या प्राण्याचा ‘संरक्षित प्राणी’ या यादीतील समावेश केंद्र सरकारने वगळला तर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होणे शक्य आहे. दिल्लीत सुटणाऱ्या प्रश्नासाठी गल्लीत आदळआपट का सुरू आहे, असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.