मोदीजी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली?’ उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या सहा दिवसाच्या आंदोलनाची सुरुवात

  मुंबई : मोदीजी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली?’ या घोषणेवरुन देशात कॉंग्रसने भाजप विरुद्ध जोरदार लढाई सुरु केली आहे. त्यात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मंगळवारी भाजपविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजपला सत्याचा सामना करावाच लागेल. उत्तर मुंबईतून या आंदोलनाची सुरुवात होईल, असे जगताप यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, कोरोना लसीकरणाबाबत देशात दयनीय स्थिती आहे. १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण करायला हवे ते झाले नाही. पंतप्रधान म्हणतात की राज्याची जबाबदारी आहे. लसीचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार रेशनिंग करत आहे.

  लसीसाठी कोणताही करार नाही

  जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी देशात लसीकरण करुन घेतले. मात्र, भारतात पंतप्रधान कोरोना नष्ट झाला असे सांगत ९३ देशांना लस विकतात. भाजप नेते याचे समर्थन करतात. देशाचा लसीसाठी कोणताही करार नाही. मी देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करतो अशा शब्दात भाई जगताप यांनी भाजपवर जोरदार टिका केली

  पुढील ६ दिवस विरोध सुरु राहणार

  भाई जगताप म्हणाले की, काँग्रेसकडून उत्तर मुंबईतून या आंदोलनाला सुरुवात होईल. मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रात लसीकरण केंद्राबाहेर शंभर कार्यकर्ते आंदोलन करतील. त्यावेळी मास्क घालून मानवी साखळी तयार केली जाईल. पुढील ६ दिवस विरोध सुरु राहणार असल्याचे जगताप यांनी जाहीर केले. मोदीजी, आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली? असा प्रश्न या आंदोलनातून विचारला जाणार आहे.  यावेळी भाजपला सत्याचा सामना करावाच लागेल, असे आव्हान भाई जगताप यांनी दिले आहे.

  केंद्र सरकारकडून राज्याची कोंडी

  यावेळी पत्रकारांशी बोलताना जगताप म्हणाले की, काळ्या बुरशी अर्थात ब्लॅक फंगसवरील उपचारांसाठी लागणारे इंजेक्शन महाग आहे. एका इंजेक्शनसाठी १ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये लागतात. सर्वसामान्यांना हे परवडणारे नाही. केंद्राने राज्य सरकारला हे इंजेक्शन खरेदी करण्यासाठी मनाई केली आहे. केंद्राने परवानगीची अट टाकली आहे. मुंबईला रोज २ हजार इंजेक्शनची गरज आहे. एका पॅकेटमध्ये ७ गोळ्या असलेले पॅकेट २० हजार रुपयांना आहे. हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. अशावेळी केंद्र सरकारकडून राज्याची कोंडी केली जात आहे. राज्याला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप जगताप यांनी केला.