मराठा समाजाने हक्काचे मागितले तर काँग्रेसला राग का येतो? : भाजपाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांचा सवाल

राजकीय स्वार्थासाठी चंद्रकांत पाटील यांनी छत्रपतींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप संजय लाखे पाटील यांनी केला आहे. असा आरोप करून लाखे पाटील यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केला आहे. अशा रितीने शाहू महाराजांचा वारस असलेल्या छत्रपतींवर कोणीही दबाव टाकू शकत नाही, त्यांना फक्त आवाहन केले जाऊ शकते.

  मुंबई : मराठा आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरले नाही तर वेळ निघून जाईल असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाजाला सावध केले तर काँग्रेस पक्षाला सहन झाले नाही. मराठा समाजाचे आरक्षण घालविल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या हक्काचे मागितले तरीही तुम्हाला राग का येतो, असा सवाल भाजपाचे नेते माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय लाखे पाटील यांना केला.

  समाजाला जागृत करत आहेत
  संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे आणि चुकांमुळे मराठा समाजाचे असलेले आरक्षण गमावले. ते पुन्हा मिळविण्यासाठी चंद्रकांत पाटील पुढाकार घेत आहेत आणि समाजाला जागृत करत आहेत, तर त्याचा काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांना इतका राग का यावा, हा प्रश्न आहे. चंद्रकांत सर्वसामान्य मराठा लोकांचे दुःख मांडत आहेत. सामान्य मराठ्यांनी त्यांच्या हक्काचेही मागायचे नाही का, याचे उत्तर संजय लाखे पाटील यांनी द्यावे.

  कोणतेही राज्य महाराष्ट्राच्या जवळपासही नाही
  ते म्हणाले की, मराठा समाज कोरोनाच्या परिस्थितीत आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्यास उत्तर प्रदेशसारखी स्थिती होईल, ही संजय लाखे पाटील यांनी व्यक्त केलेली भिती निरर्थक आणि हास्यास्पद आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि कोरोना मृत्यू आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्राची स्थिती उत्तर प्रदेशसारखी होण्यासाठी येथील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यू कमी व्हायला हवेत आणि ते शक्य नाही. महाविकास आघाडीच्या अपयशामुळे कोरोनाच्या बाबतीत उत्तर प्रदेशसह अन्य कोणतेही राज्य महाराष्ट्राच्या जवळपासही नाही हे राज्याचे दुर्दैव आहे.

  छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान
  राजकीय स्वार्थासाठी चंद्रकांत पाटील यांनी छत्रपतींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप संजय लाखे पाटील यांनी केला आहे. असा आरोप करून लाखे पाटील यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केला आहे. अशा रितीने शाहू महाराजांचा वारस असलेल्या छत्रपतींवर कोणीही दबाव टाकू शकत नाही, त्यांना फक्त आवाहन केले जाऊ शकते. अर्थात हे समजायला आधी भाजपाप्रमाणे छत्रपतींचा सन्मान करायला हवा, असा टोला त्यांनी हाणला. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन करावे, भाजपा त्यांना पाठिंबा देईल, अशी भूमिका प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केली आहे. संपूर्ण पक्ष प्रदेशाध्यक्षांशी सहमत आहे, असे ते म्हणाले.