मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा का देत नाहीत?; नारायण राणेंचा सवाल

    मुंबई : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्याचं राजकारण तापतं चाललं आहे. विरोधी पक्ष अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाला होता. त्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. दरम्यांन हा तपास सिबीआयकडे गेला आहे, याचं पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे, मात्र मुख्यमंत्री राजीनामा का देत नाहीत, असा सवाल भाजपचे नेते नारायण राणे यांनी उपस्थित केला.

    नारायण राणे काय म्हणाले?

    दरम्यांन नारायण राणे म्हणाले की, ‘परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात केलेल्या दाव्यात सीबीआयने 15 दिवसांत चौकशी करुन अहवाल द्यावा, असे माननीय उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयाबद्दल बहुतांशी राजकारणी प्रतिक्रिया देत आहेत. या केसशी संबंधित असलेल्या सचिन वाझेंना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री प्रतिक्रिया का देत नाहीत? किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा का देत नाहीत?’ असा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी ट्विटरवरुन सवाल विचारला आहे.

    काय आहे हे संपूर्ण प्रकरण

    गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आणखी तीन याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा दिलेला निर्णय ठाकरे सरकारसाठी धक्का मानला जात आहे. मुंबई हायकोर्टाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, तर परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली आहे.