“मनसुख हिरेनच्या पत्नीचा सचिन वाझेवर का संशय?” मुख्यमंत्री गप्प आहेत, तोपर्यंत विधानसभा ठप्प राहणार!; चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना इशारा

हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीचा हवाला देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांनी हिरेन यांचा खून केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राज्यातील राजकारण तापलं असून, याच मुद्द्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेचं कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला आहे.

    विधिमंडळ अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी तीव्र पडसाद उमटत आहेत. भाजपाकडून पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीचा हवाला देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांनी हिरेन यांचा खून केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राज्यातील राजकारण तापलं असून, याच मुद्द्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेचं कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला आहे. तसेच याप्रकरणावरून पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी निवेदन करण्याची मागणी केली आहे.

    “मनसुख हिरेन खून प्रकरणी सचिन वाझेला संरक्षण देणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध! प्रश्न कालपण तेच होते, प्रश्न आजही तेच आहेत… जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प तो पर्यंत विधानसभा ठप्प!,” असा इशारा पाटील यांनी दिला आहे. त्याचबरोबर काही सवालही पाटील यांनी उपस्थित केले आहेत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण…. फेसबुकवर संवाद साधणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता गप्प का? मनसुख हिरेनच्या पत्नीचा सचिन वाझेवर का संशय?, मनसुख हिरेनची हत्या झाल्याचे त्यांच्या पत्नीला का वाटते?, मनसुख हिरेनची गाडी सचिन वाझे वापरत होते का?, असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

    मनसुख यांचा मृतदेह ५ मार्चला मुंब्रा खाडीत, रेती बंदर येथे आढळला होता. मनसुख यांच्या चेहेऱ्यावर पाच ते सहा हातरुमालांचा गठ्ठा आढळला. तसेच शवचिकित्सेत मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला. त्यामुळे विमला यांचा जबाब आणि शवचिकित्सेतून पुढे आलेल्या निरीक्षणांआधारे एटीएसने रविवारी रात्री अनोळखी व्यक्तीविरोधात हत्या, पुरावा नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केलेला आहे.