‘महाराष्ट्रात ‘घंटा’ बडवताय कशाला? हिंमत असेल तर..’ सामनातून भाजपला आव्हान

‘महाराष्ट्रात ‘घंटा’ बडवताय कशाला? गर्दीवर, सणांवर निर्बंध आणा अशा केंद्राच्याच सूचना आहेत. मग दिल्लीत जाऊन घंटानाद करण्याची हिंमत दाखवत का नाही?’ असा थेट सवाल सामनातून भाजपला विचारण्यात आला आहे.

    कोरोनामुळे मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने राज्यातील मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या लाटेत बंद झालेली मंदिरं अद्याप उघडण्यात आलेली नसल्याने, राज्यातील सर्व मंदिरं दर्शनासाठी खुली करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका समोर असताना सावधानता म्हणून मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

    भाजपच्या याच मागणीचा आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. ‘महाराष्ट्रात ‘घंटा’ बडवताय कशाला? गर्दीवर, सणांवर निर्बंध आणा अशा केंद्राच्याच सूचना आहेत. मग दिल्लीत जाऊन घंटानाद करण्याची हिंमत दाखवत का नाही?’ असा थेट सवाल सामनातून भाजपला विचारण्यात आला आहे.

    काय म्हटलंय सामनात?

    ‘‘तिसरी लाट जास्त धोकादायक आहे. दहीहंडी व गणेशोत्सवात सावधानता बाळगा,’’ असे केंद्र सरकारनेच ठाकरे सरकारला ‘लेखी’ कळवले आहे. आता तुम्ही दिल्लीतल्या तुमच्या माय-बापांचेही ऐकणार नाहीत का? महाराष्ट्रात ‘घंटा’ बडवताय कशाला? गर्दीवर, सणांवर निर्बंध आणा अशा केंद्राच्याच सूचना आहेत. मग दिल्लीत जाऊन घंटानाद करण्याची हिंमत दाखवत का नाही? महाराष्ट्रातून शिष्टमंडळ घेऊन दिल्लीस जावे व पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भेटावे. त्यांच्या दारात मंदिर उघडण्यासाठी जागर करावा, पण यांची बोंबाबोंब महाराष्ट्रात सुरू आहे. ‘दुखणे पोटाला आणि प्लॅस्टर पायाला’ त्यातलाच हा प्रकार. केंद्र सरकारने निर्बंधांबाबत पाठवलेल्या खलित्याची होळी करायची की सुरनळी यावरही विरोधकांकडून मार्गदर्शन व्हावे!