शिर्डीतील पुजाऱ्यांना तोकडे कपडे कसे चालतात? भक्तांनाच सभ्य पोषाखाची सक्ती का? तृप्ती देसाईंचा सवाल

भक्तांनी सभ्य पोषाख धारण करावा, या साई संस्थानाच्या सूचनांवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतलाय. ही सक्ती फक्त भक्तांनाच का, पुजाऱ्यांना का नाही? असा सवाल त्यांनी साई संस्थानाला विचारला आहे.

शिर्डीच्या साई संस्थानाने भक्तांना नुकतेच एक आवाहन केले. त्यानुसार भक्तांनी साईंच्या दर्शनाला येताना तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांच्या अंगावर सभ्य पोषाख असावा, असे संस्थानाने म्हटले आहे.

भक्तांनी सभ्य पोषाख धारण करावा, या साई संस्थानाच्या सूचनांवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतलाय. ही सक्ती फक्त भक्तांनाच का, पुजाऱ्यांना का नाही? असा सवाल त्यांनी साई संस्थानाला विचारला आहे.

भक्तांना विशिष्ट कपड्यांसाठी सक्ती करणं हा राज्यघटनेनं दिलेल्या मुलभूत अधिकारांचा भंग असल्याचं देसाईंचं म्हणणं आहे. कुणी कुठले कपडे घालावेत, हे प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे साई संस्थानाने भक्तांच्या अधिकारांवर अतिक्रमण करू नये, असंही त्यांनी म्हटलंय.

अनेक पुजारी अर्धनग्न अवस्थेत मंदिरात फिरत असतात. त्यांच्यावर कधीही कुठल्या भक्तांनी आक्षेप घेतलेला नाही. मग भक्तांच्या पोषाख स्वातंत्र्यावरच आक्षेप का, असा सवाल देसाई यांनी केलाय. शिर्डी संस्थानानं हा आदेश मागे घेतला नाही, तर आंदोलनाचा इशारा तृप्ती देसाईंनी दिलाय.