भाजप शिवसेनेसह सत्ता स्थापन करणार की नाही? देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

फडणवीस म्हणाले की त्यांनी आमच्या बरोबर निवडणूक लढवली पण निवडून आल्यानंतर ते आमचा हात सोडून ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्या बरोबर निघून गेले इतकाच मतभेदाच मुद्दा आहे, असेही उद्गार त्यांनी काढले. ठाकरे सरकारने लोकशाहीला टाळे लावण्याचे काम केले आहे. सभागृहात कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ नये, जनतेचे महत्वाचे प्रश्न उपस्थित करताच येऊ नयेत अशी व्यवस्था उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात करण्यात आली आहे अशी टीका करून फडणवीस म्हणाले की उद्याचे दोन दिवस धरून या सरकारच्या सर्व सहा सात अधिवेशनांचा काळ फक्त 38 दिवसांचा भरतो. म्हणजे कोणतेही अधिवेशन धड पाच दिवसही ते घेऊ शकले नाहीत.

  मुंबई : शिवसेनेबरोबर पुन्हा सत्ता स्थापन कऱण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाची व सेनेची कोणतीही अधिकृत चर्चा सुरु नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन करतानाच शिवसेना म्हणजे आमचा शत्रू नाही, आमचे फक्त वैचारिक मतभेद आहेत, असे उद्गार विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांनी काढले. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक आज भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात पार पडली. त्या प्रसंगी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  फडणवीस म्हणाले की त्यांनी आमच्या बरोबर निवडणूक लढवली पण निवडून आल्यानंतर ते आमचा हात सोडून ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्या बरोबर निघून गेले इतकाच मतभेदाच मुद्दा आहे, असेही उद्गार त्यांनी काढले. ठाकरे सरकारने लोकशाहीला टाळे लावण्याचे काम केले आहे. सभागृहात कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ नये, जनतेचे महत्वाचे प्रश्न उपस्थित करताच येऊ नयेत अशी व्यवस्था उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात करण्यात आली आहे अशी टीका करून फडणवीस म्हणाले की उद्याचे दोन दिवस धरून या सरकारच्या सर्व सहा सात अधिवेशनांचा काळ फक्त 38 दिवसांचा भरतो. म्हणजे कोणतेही अधिवेशन धड पाच दिवसही ते घेऊ शकले नाहीत.

  हा कमितकमी दिवस अधिवेशन घेण्याचा विक्रमच ठाकरे सरकारने केला आहे अशीही टीका फडणवीस यांनी केली. या वेळी व्यासपीठावर परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, महादेव जानकर आदि नेते उपस्थित होते.

  अजित पवार आणि परब यांची चौकशी व्हावी

  अनिल देशमुखांची चौकशी ही उच्च न्यायालयाच्या निर्णय़ानुसारच सुरु झाली आहे. जरंडेश्वर कारखाना प्रकरणात झालेली कारवाई हीही न्यायालयाच्या निर्णय़ानेच झालेली आहे. भाजपाला कोणतीही राजकीय वा सूडबुद्दीची कारवाई करायची नाही. जर परमबीर सिंगांच्या पत्रानुसार देशमुखांची चौकशी होते तर तसेच पत्र वाझे याने लिहिले आहे, त्यात अनिल परब आणि अजितदादा पवारांच्या विषयी उल्लेख आहेत. त्यामुळे त्याही पत्राच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे व चंद्रकांत पाटील यांनीही तसेच पत्र लिहिले आहे, असेही ते म्हणाले.

  विधिमंडळात आरक्षणाचा विषय कसा काढणार?

  मराठा आरक्षणाचा तसेच ओबीसी आरक्षणाचाही विषय या अधिवेशनात काढता येणार नाही. कारण यांनी कोणतीही संसदीय आयुधे वापरण्यालाच बंदी घातलेली आहे. मात्र सभागृहात बोलू दिले नाही तर जनतेमध्ये जाऊन आम्ही बोलणार. आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहेच तेंव्हा मग कोरोनामुळे आंदोलने नकोत असे बोलू नका असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  लोणकर सरकारी अनास्थेचा बळी

  एमपीएससी परीक्षा दिल्यानंतर नेमणूक न मिळालेल्या स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्ये बाबत सरकारी अनास्थेचा तो बळी ठरला असा संताप व्यक्त करून फडणवीस म्हणाले की एमपीएससीवर सदस्यच नेमलेले नाहीत तर मुलाखती कशा होणार व नेमणुका कसा दिल्या जाणार असाही प्रश्न आहे. त्या नेमणुका तातडीने करा आणि एमपीएससीची यंत्रणा ओव्हरऑइलिंग केली पहिजे असे संगून फडणवीस म्हणाले की निराशेपासून या तरुणांची सुटका केली पहिजे.