बीएमसी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर कारवाई करणार का? नितेश राणेंचा पालिकेला सवाल

अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut)  कार्यालयावर अवैध बांधकामाचे कारण देत मुंबई महापालिकेचा (BMC) हातोडा पडला आहे. यावरून भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मुंबई :  मुंबईतील (Mumbai)  पाली हिल परिसरात असलेल्या कंगना रणौतच्या (Kangana Ranaut)  कार्यालयावर अवैध बांधकामाचे कारण देत मुंबई महापालिकेचा (BMC) हातोडा पडला आहे. यावरून भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, सर्वांनाच सारखा कायदा लागू होतो, अशी आशा आहे. महापालिकेची टीम आता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मन्नत बंगल्यावर जाणार का? निश्चितच नाही.एवढी हिम्मत ते कशी दाखवू शकतात. सबका टाइम आयेगा, असेही नितेश राणे यांनी ट्विट करत पालिकेसमोर प्रश्न उपस्थित केला आहे.

मुंबईतील आमदार आणि प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करुन मातोश्रीच्या जवळ असलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आज कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईनंतर मुंबई महापालिकेसमोर प्रश्न उपस्थित केला आहे.

महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली. कंगनाच्या वकिलांनी महापालिकेकडून जुहू येथील कार्यालयावर करण्यात येत असलेल्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असुन सुनावणीला सुरुवात जाली आहे. उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने पालिकेकडून कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.