पोलिसांची निष्ठा तपासणार; गृहमंत्री वळसे पाटील यांची घोषणा

  मुंबई : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलिस दलामध्ये कुणाची निष्ठा काय आहे, कुणावर आहे हे येत्या काळात तपासून पाहिले जाईल. योग्य ती माहिती घेतली जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा गृहमंत्री वळसे-पाटील यांनी यावेळी केली.

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिस दलातील माहिती कशी मिळते? या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी दिले. फडणवीस हे मुख्यमंत्री होते. तसेच गृहखात्याचा पदभार त्यांच्याकडे पाच वर्षे होता. त्यामुळे गृहखात्यातील अधिकारी त्यांच्या संपर्कात असणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांना माहिती मिळते. त्यावरही लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  प्रशासनात राजकीय हस्तक्षेप राहणार नाही

  कठीण काळात गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलिस दलाचे सक्षमीकरण करणे ही महत्त्वाची बाब आहे. स्वच्छ प्रशासन देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे सांगतानाच प्रशासकिय कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाही वळसे-पाटील यांनी दिली.

  बदल्या नियमानुसारच

  महिला आणि सामान्य नागरिकांना गृहविभागाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करणार आहे. त्याकरिता आजीमाजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिस दलाचे सक्षमीकरण करण्यात येईल. स्वच्छ प्रशासन देण्यावर भर असेल. तसेच प्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप करणार नाही. बदल्याच्या संदर्भात प्रत्येक विभागाची जी पद्धत ठरली आहे, वेगवेगळ्या स्तरावर जे अधिकार दिले आहेत. त्यानुसार काम करू, शक्ती कायदा, पोलिस भरती गतीमान करणे, पोलिसांना घरे देणे या सर्व गोष्टींवर लक्ष देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.