सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीला लवकरच भेट देणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आश्वासन

वर्धा येथील सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटी गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहे. कोविड-19 आपत्तीतही कस्तुरबा हेल्थ सोसायटीने महत्वाची भूमिका बजावली असून आपण स्वत: लवकरच या सोसायटीला भेट देणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

मुंबई (Mumbai).  वर्धा येथील सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटी गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहे. कोविड-19 आपत्तीतही कस्तुरबा हेल्थ सोसायटीने महत्वाची भूमिका बजावली असून आपण स्वत: लवकरच या सोसायटीला भेट देणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीसंदर्भातील बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने. कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धीरुभाई मेहता, महात्मा गांधी इन्सिटयूट ऑफ मेडिकल सायन्सचे अधिष्ठाता डॉ. नितीन गांगणे, कस्तुरबा हेल्थ सोयायटीचे सचिव डॉ. बी.एस.गर्ग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की,कस्तुरबा हेल्थ सोसायटीने कोविड-19 काळात मोठे काम केले आहे. मेळघाटामध्ये 50 खाटांचे रुग्णालय असून येथेही अनेक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. गेल्या 50 वर्षात ही सोसायटी वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असून आपण लवकरच या सोसायटीला भेट देणार आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र शासनामार्फत 50 टक्के आणि राज्य शासनामार्फत 25 टक्के आणि उर्वरित 25 टक्के खर्च संस्थेकडून केला जातो. सध्या महाराष्ट्र अजूनही कोविड-19 परिस्थितीशी मुकाबला करीत असून राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत राज्य शासन सकारात्मक आहे.