पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक कॉंग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? तरीही सरकार पडणार नाही : राजकीय चर्चाना उधाण

मुख्यमंत्र्यानी याबाबत निर्णय घेतला नाही तर काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे अशी माहिती ज्येष्ठ कॉंग्रेस मंत्र्नी दिली आहे. सरकारमधून कॉंग्रेस बाहेर पडली तरी भाजपचा राजकीय फायदा होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेस घेईल, अशी माहिती या ज्येष्ठ नेत्याने दिली.

  मुंबई : मुंबईच्या किना-यावर नुकतेच एक चक्रीवादळ येवून गेले. त्यातून मुंबई कशीबशी वाचली आहे. मात्र सध्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुदयावर मुंबईत मंत्रालयात राजकीय वादळ घोंघावत असल्याचे दिसत आहे. पदोन्नती आरक्षणाचा शासन निर्णय  उपसमितीमधील कॉंग्रेसच्या नेत्यांना विश्वासात न घेताच काढण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनी तो रद्द करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

  मुख्यमंत्र्यानी याबाबत निर्णय घेतला नाही तर काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे अशी माहिती ज्येष्ठ कॉंग्रेस मंत्र्नी दिली आहे. सरकारमधून कॉंग्रेस बाहेर पडली तरी भाजपचा राजकीय फायदा होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेस घेईल, अशी माहिती या ज्येष्ठ नेत्याने दिली.

  टोकाची भूमिका घेण्यास मागेपुढे पाहणार नाही

  काल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक झाली.पदोन्नतीतील आरक्षणाचा  शासन निर्णय काढण्याचा निर्णय उपसमितीच्या सदस्य असलेल्या कॉंग्रेस सदस्यांना विश्वासात न घेता घेण्यात आला. असा आरोप त्यांनी केला आहे. हा निर्णय आता मागे घेतला नाही तर काँग्रेस टोकाची भूमिका घेण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवण्याचा मुख्यमंत्री निर्णय घेतात का? याची प्रतिक्षा आहे असे हा नेता म्हणाला.

  न्यायालयाच्या आदेशाची वाट पहावी

  दरम्यान या निर्णयाबाबत कालच उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे, न्यायालयाने निर्णयाच्या आधीन राहून या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती देत सामान्य प्रशासन विभागातील उच्च पदस्थांनी सांगितले की, प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना काहीही निर्णय घेणे योग्य होणार नसल्याने या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाची वाट पहावी असे मुख्यमंत्र्याकडून कॉंग्रेस नेत्यांना सूचित केले जाण्याची शक्यता आहे. या विषयावर विधी न्याय विभागाचा अभिप्राय प्रलंबीत असताना घाईने काही निर्णय घेणे आणि त्यानुसार राजकीय कृती करणे अडचणीचे ठरण्याची शक्यताअसल्याचे या सूत्रांनी सांगितले.

  ऊर्जामंत्री नितीन राऊत आक्रमक

  काँग्रेसचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यां मुद्यावर सध्या आक्रमक आहेत.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीमध्ये ते सदस्य आहेत मात्र पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय काढताना त्याना किंवा उपसमितीच्या अन्य सदस्यांना तसेच काँग्रेसपक्षाला विश्वासात घेतले नसल्याची त्यांची तक्रार आहे. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेसने राज्यभरातील अधिकारी-कर्मचारी संघटना, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा केली.

  पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे या मुद्यावर काँग्रेस ठाम असून याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. आम्ही ७ मे रोजीचा निर्णय रद्द करायला सरकारला भाग पाडू, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. या प्रश्नावर काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून निर्णय रद्द करण्याची मागणी करणार आहे. पदोन्नतीतील आरक्षणाचा जीआर मुख्यमंत्र्यांनी रद्द केला नाही तर काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या भुमिकेत आहे.