या वर्षात लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार? पालिका आयुक्तांची लोकल सुरु करण्याबाबत महत्त्वाची माहिती

काही दिवसांत नाताळ व नवीन वर्षाची धामधूम असेल. यावेळी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय यानंतरच घेतला जाऊ शकतो, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.

मुंबई : मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येईल अशी शक्यता वर्तवली जात असली तरी सध्या रुग्णांची संख्या समाधानकारक आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे मुंबईत लोकल सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल लोकल सुरु करण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

काही दिवसांत नाताळ व नवीन वर्षाची धामधूम असेल. यावेळी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय यानंतरच घेतला जाऊ शकतो, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईत दिवाळीत झालेली गर्दी व भेटीगाठीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता होती. मात्र, सध्या ७०० ते ८०० पर्यंत रोज रुग्ण आढळत आहेत.  सध्या ही स्थिती समाधानकारक आहे.  मात्र, तरीही कोरोनाचा धोका अजून कायम आहे.

नाईट क्लबप्रमाणे नियम धाब्यावर बसवून शेकडो लोक विनामास्क एकत्र गर्दी करीत असतील तर दुसरी लाट यायला वेळ लागणार नाही. सध्याची कोरोनाची स्थिती समाधानकारक असली तरी २० डिसेंबर पर्यंत एकूण कोरोना स्थितीचा अभ्यास करावा लागेल. त्यावरच पुढील सर्व निर्णय अवलंबून असतील.

मात्र, येत्या काही दिवसांत नाताळचा सण व नवीन वर्षाची धामधूम असणार आहे. त्यावेळी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना स्थितीचा अभ्यास केला जाईल. आजची कोरोनाची स्थिती त्यावेळीही तशीच राहिल्यास लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असे चहल यांनी सांगितले.

विनामास्क फिरणा-यांवर कारवाई तीव्र

कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना सुरु आहेत. मुंबईकरांच्या सहकार्यामुळे कोरोना नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे. त्यामुळे अनलॉकची प्रक्रिया टप्प्य़ा-टप्प्याने सुरु करण्यात आली आहे. मात्र, अजूनही लस आलेली नसल्याने सोशल डिस्टनसिंग व मास्कचा वापर करणे आवश्यक झाले आहे. असे असतानाही कोरोना सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरता लोक फिरत आहेत. पालिकेकडून विनामास्क फिरणा-यांवर कारवाई केली जाते. ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.