राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार?; ऑगस्ट अखेर राज्यात कॉंग्रेसच्या पहिल्या महिला विधानसभाध्यक्ष होण्याची शक्यता

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तिसरा भिडू असलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या मंत्र्यामध्ये सध्या फेरबदलांचे वारे वाहात असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सध्या दिल्ली दौ-यावर असून त्यांच्यासोबत महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील गेल्या काही दिवसांत हायकमांडची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात महिला आणि बालबिकास मंत्री यशोमती ठाकूर यांना बढती देत राज्याच्या पहिल्या महिला विधानसभाध्यक्ष होण्याचा मान मिळण्याची चर्चा आहे.

  मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तिसरा भिडू असलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या मंत्र्यामध्ये सध्या फेरबदलांचे वारे वाहात असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सध्या दिल्ली दौ-यावर असून त्यांच्यासोबत महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील गेल्या काही दिवसांत हायकमांडची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात महिला आणि बालबिकास मंत्री यशोमती ठाकूर यांना बढती देत राज्याच्या पहिल्या महिला विधानसभाध्यक्ष होण्याचा मान मिळण्याची चर्चा आहे. ऑगस्ट अखेर राज्यमंत्रिमंडळात फेरबदल अपेक्षीत असून विधानसभाध्यक्षपदासाठी २ दिवसांचे विशेष अधिवेशन घेतले जाण्याची शक्यता आहे.

  प्रदेशाध्यक्षपदी कामगिरी करून दाखवणार

  गेल्या काही दिवसांपासून पक्षात विधानसभा अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हे ठरविण्यासाठी चाचपणी सुरू असून सध्या चर्चेत असलेल्या मंत्र्यापैकी कुणालाच या पदावर काम करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा अध्यक्षपद सोडून प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झालेल्या नाना पटोले यांची मंत्री होण्याची इच्छा लपून राहीली नसली तरी सध्या त्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणुनच कामगिरी करून दाखवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जाणकार सूत्रांनी दिली.

  राज्याच्या पहिल्या महिला विधानसभाध्यक्ष

  कॉंग्रेसपक्षात गेल्या दोन वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर फेरबदल करण्याचे संकेत मिळत असून त्यात महिला आणि बालबिकास मंत्री यशोमती ठाकूर यांना बढती देत राज्याच्या पहिल्या महिला विधानसभाध्यक्ष होण्याचा मान मिळण्याची चर्चा आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकूर यांची इच्छा नसली तरी हायकमांडने जबाबदारी दिल्यास त्या विदर्भातून येणाऱ्या राज्याच्या पहिल्या महिला विधानसभा अध्यक्ष होवू शकतात. त्यांच्या रिक्त जागेवर राज्यमंत्री सतेज पाटील किंवा विश्वजीत कदम यापैकी एका मंत्र्याला बढती देण्यात येणार असून सोलापूरच्या आमदार प्रणती शिंदे यांना राज्यमंत्री मंडळात राज्यमंत्रीपदावर संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

  राष्ट्रवादी आणि शिवसेनाही रिक्त जागा भरणार

  राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख यांची रिक्त जागा भरण्यासाठी आ. शशिकांत शिंदे यांचे नाव घेतले जात आहे. त्यांना कामगार खात्याची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा आहे. तर शिवसेनेत संजय राठोड यांना क्लिनचीट मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले असल्याने त्यांच्या रिक्त जागी नागपूरचे आशिष जयस्वाल, किंवा कोकणातून नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्याने शिवसेनेला आक्रमक नेत्याची गरज भासणार आहे त्यामुळे भास्कर जाधव यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.