अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

    मुंबई : अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे राष्ट्रीय यंत्रणेच्या ताब्यात असून, त्यांनी आज अनिल देशमुखांसह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप होत आहे. याचं पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

    सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी कामावर रूजू होण्यासाठी 2 कोटी रुपये खंडणी मागितली होती, तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी महापालिका कंत्राटदाराकडुन प्रत्येकी 2 कोटी वसुल करण्यास सांगितल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या सर्व प्रकरणामुळे आता अनिल देशमुख यांच्यासहपरिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारला आहे.

    अनिल परब यांचं स्पष्टीकरण

    सचिन वाझे याने अनिल परब यांचं नाव घेतल्यानंतर स्वतः परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचं खंडन केलं आहे. या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी म्हटलं आहे की, ‘मी माझ्या दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो की माझ्यावरील सर्व आरोप खोटे असून मला बदनाम करण्याचा हा कट आहे.’ मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करण्याची भाजपची ही रणनीती असल्याचं आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी व्यक्त केलं.