एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने काँग्रेस विचारांचा सच्चा पाईक हरपला : नाना पटोले

अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेल्या एकनाथ गायकवाड यांना गोरगरीब जनतेच्या समस्यांची जाण होती. ते सतत लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत होते. अत्यंत दांडगा जनसंपर्क असणारे गायकवाड तीन वेळा विधानसभेवर आणि दोन वेळा लोकसभेत निवडून गेले. राज्याच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून आरोग्य वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार अशी विविध खाती त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली.

    मुंबई : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खा. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेस विचारांचा सच्चा पाईक हरपला असून आपण एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

    एकनाथ गायकवाड यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेल्या एकनाथ गायकवाड यांना गोरगरीब जनतेच्या समस्यांची जाण होती. ते सतत लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत होते. अत्यंत दांडगा जनसंपर्क असणारे गायकवाड तीन वेळा विधानसभेवर आणि दोन वेळा लोकसभेत निवडून गेले. राज्याच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून आरोग्य वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार अशी विविध खाती त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली.

    अत्यंत कठिण काळात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडून त्यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवला. एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. एकनाथ गायकवाड यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी गायकवाड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.