mobile theft by woman

लोहमार्ग पोलिसांनी अटक केलेली दक्षिणा पवार ही सराईत चोर असून, ती लहानपणापासून रेल्वे स्थानक परिसरात चोऱ्या करत आहेत. तिच्याविरुद्ध पनवेलमध्ये ५ तर मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत.

    मुंबई : दादर(Dadar) रेल्वे स्थानकात मोबाईल चोरताना(Mobile Theft) दक्षिणा पवार (२७) हिला रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी १० जून रोजी केली. या कारवाईत पोलिसांनी २ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही महिला पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तिच्याविरुद्ध अनेक १० गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

    दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी पश्चिम मार्गावरील दादर रेल्वे स्थानकात तुडुंब गर्दी झाली. या गर्दीत दक्षिणा पवार ही संशयास्पदरीत्या फलाट क्रमांक दोनवर फिरताना मुंबई सेंट्रल लोहमार्ग पाेलिसांच्या लक्षात आले. लोहमार्ग पाेलिसांनी तिच्यावर पाळत ठेवली.दरम्यान, स्थानकात चर्चगेट लोकल आली. महिलांच्या राखीव डब्यात चढत असताना एका प्रवासी महिलेच्या बॅगेतून मोबाईल काढताना दक्षिणाला लोहमार्ग पोलिसांनी बघितले. मोबाईल चोरून पळ काढताना पोलिसांनी तिला पकडले. तिच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात ३१ हजार रुपयांचे दोन मोबाईल आढळून आले. या मोबाईल चोरीला गेल्या प्रकरणी मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

    ही कारवाई वरिष्ठ लोहमार्ग पोलीस निरीक्षक महबुब इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. के. डोके, हवालदार पी. एस. घार्गे, एस. व्ही. बने, सोनावणे, पोलीस नाईक साळुंखे. जाधव, महाडिक, पाटील, वळवी, महिला अंमलदार वळवी, पोटे, करंजीकर व बच्चे, गुरव आदी पथकाने केली.