तीन कोटींच्या हेरॉईनसह महिलेल्या ठोकल्या बेड्या;वरळी अंमलीपदार्थविरोधी पथकाची कारवाई

अंमलीपदार्थविरोधी पथकाने काळाबादेवी परिसरातील पि्रन्सेस स्ट्रीट येथे सापळा लावून सरस्वती नायडू (५०) या महिलेला ताब्यात घेतले. तिची झडती घेतली असता एक किलो २७ ग्रॅम हेरॉईन आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत ३ कोटी रुपये आहे.

    मुंबई: हेराॅईन विकण्यासाठी आलेल्या महिलेला वरळी अंमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) ३ जून रोजी काळबादेवी परिसरात बेड्या ठोकल्या. या कारवाईत तब्बल ३ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. महिलेला न्यायालयात हजर केले असता आठ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
    मुंबईतील अंमलीपदार्थांची वाढती तस्करी लक्षात घेऊन पोलीस सह आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अंमलीपदार्थविरोधी विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने वरळी अंमलीपदार्थविरोधी पथक तस्कऱ्यांवर लक्ष ठेवून असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशाेक चांदे यांना अंमलीपदार्थाची विक्री होणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली. सदर माहितीच्या आधारे वरळी अंमलीपदार्थविरोधी पथकाने काळाबादेवी परिसरातील पि्रन्सेस स्ट्रीट येथे सापळा लावून सरस्वती नायडू (५०) या महिलेला ताब्यात घेतले. तिची झडती घेतली असता एक किलो २७ ग्रॅम हेरॉईन आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत ३ कोटी रुपये आहे. सदर अंमलीपदार्थ दक्षिण व मध्य मुंबईत विकत असल्याची कबुली सरस्वतीने चौकशीदरम्यान दिली.
    सदर कारवाई पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) विरेश प्रभू, अंमलीपदार्थविरोधी विभागाचे उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप काळे, वरळी अंमलीपदार्थविरोधी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विवेक खवळे, पोउपनि द्वारका पोटवडे, सपोउपनि अशोक चांदे, हवालदार प्रदीप साळवे, पोलीस अंमलदार रवींद्र मते, प्रीतम ढोरे, महेश गायकवाड, दत्ताराम माळी आदी पोलीस पथकाने केली.