mumbai criminals

रईस दहिसर रेल्वे स्टेशननजीक असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. त्याला सहा वर्षांची मुलगी आणि अडीच वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, शेजारी राहाणाऱ्या अनिकेत उर्फ अमित मिश्रासोबत शाहिदाचे विवाहबाह्य संबंध(Extra Marital Affair) सुरू झाले.

    मुंबई: पूर्वेच्या रावळपाडा येथील खान कंपाऊंडमध्ये एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा खुलासा एका ६ वर्षांच्या चिमुरडीने केला आहे. तिच्या आईने मुलीसमोरच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या(Woman killed her husband) केली. घटनेच्या ११ दिवसानंतर मुलीने दिलेल्या माहितीवरुन दहिसर पोलिसांनी(Dahisar Police) तिच्या वडिलांचा मृतदेह घराच्या स्वयंपाकघरातून खोदून(Dead body) बाहेर काढला. पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, काही तासांत प्रियकरालाही आरे कॉलनीच्या जंगलातून पोलिसांनी ताब्यात घेतले.


    उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये रईस शेखचे २०१२ साली शाहिदा नावाच्या तरुणीसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर हे दोघेही दहिसर पूर्वच्या रावळपाडा येथील खान कंपाउंडमध्ये भाड्याच्या घरात राहात होते. रईस दहिसर रेल्वे स्टेशननजीक असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. त्याला सहा वर्षांची मुलगी आणि अडीच वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, शेजारी राहाणाऱ्या अनिकेत उर्फ अमित मिश्रासोबत शाहिदाचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले. ही गोष्ट रईसला समजल्यानंतर त्याने या गोष्टीला विरोध केला. त्यानंतर रईस आणि शाहिदा यांच्यात खटके उडू लागले. त्यामुळे पत्नी शाहिदाने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा भयानक कट रचला. रईस अचानक २१ मेपासून गायब झाला होता.

    दरम्यान, ११ दिवसांआधी शाहिदा आणि अमित नको त्या स्थितीत असताना अचानक रईस घरी आला. यावेळी दोघांनीही घरात असलेल्या वायरने रईसचा गळा आवळून हत्या केली. याचदरम्यान सहा वर्षांची चिमुकली घरात आली. तेव्हा आईने तिला धमकी दिली, की कोणाला काही सांगितल्यास तिलादेखील वडिलांप्रमाणेच मारुन जमिनीत पुरून टाकेन. खान कंपाउंडमध्येच राहणाऱ्या रईसच्या एका मित्राने तो बेपत्ता असल्याची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दिली. दुसरीकडे शाहिदाने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या शरीराचे चार तुकडे करत त्याचा मृतदेह स्वयंपाकघरात पुरला आणि त्याचा मोबाईल आपल्यापाशी ठेवला.

    गोंडामधून घरच्यांचा फोन आल्यानंतर शाहिदा सांगायची, रईस न सांगताच कुठेतरी निघून गेला आहे. शेवटी तीन दिवसांआधी गावाहून रईसचा भाऊ खान कंपाऊंडमधील रईसच्या घरी पोहोचला. याचवेळी संधी मिळताच ६ वर्षांच्या मुलीने आपल्या काकाला आईच्या विवाहबाह्य संबंधांबद्दलची सगळी माहिती दिली. यानंतर त्याने पोलिसांनी ही सगळी घटना सांगितली. अखेर पोलिसांनी स्वयंपाकघरात पुरलेला चार तुकड्यांचा मृतदेह बाहेर काढला आहे. अशा प्रकारे सहा वर्षांच्या चिमुकलीने आपल्या वडिलांच्या हत्येचा कटाबाबत मोठा खुलासा केला.

    या गुन्ह्याचा तपास उत्तर प्रादेिशक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ ११ चे उपायुक्त विशाल ठाकूर, दहीसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक विकास लोकरे, पोलीस निरीक्षक संजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत घार्गे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओम तोटावार, महिला पोलीस उपनिरीक्षक वरलक्ष्मी सकिनाल, हवालदार संदेश तटकरे, हवालदार देवेंद्र पांगे, पोलीस नाईक शरीफ शेख, पोलीस नाईक भरत मोहिते, पोलीस अंमलदार चंद्रकांत शिरसाट, पोलीस अंमलदार राजेंद्र सांगळे, हवालदार संदीप देशमाने, हवालदार भिंगोर, पोलीस नाईक सिद्धार्थ किणी, पोलीस अंमलदार सागर पवार आदी पोलीस पथकाने केला.