मोबाईल चोरट्याशी झालेल्या झटापटीत लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

कळवा रेल्वे स्थानकातून लोकल मार्गस्थ होत असतानाच एका चोरट्यानं लोकलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यानं विद्या यांच्या हातातून मोबाईल घेत पळ काढला. तेवढ्यात चोरट्याला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात त्या लोकलमधून खाली उतरल्या, मात्र तोवर प्लॅटफॉर्म संपला आणि रेल्वेखाली आल्यानं त्यांचा मृत्यू झाला.

    मुंबई: लोकलमधून प्रवास करताना मोबाईल चोराशी झालेल्या झटापटीत लोकलमधून पडून रेल्वेखाली आल्याने विद्या पाटील महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. लोकलच्या महिला डब्ब्यातून केवळ पाच महिला प्रवास करत होत्या. कळवा रेल्वे स्थानकातून लोकल मार्गस्थ होत असतानाच एका चोरट्यानं लोकलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यानं विद्या यांच्या हातातून मोबाईल घेत पळ काढला. तेवढ्यात चोरट्याला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात त्या लोकलमधून खाली उतरल्या, मात्र तोवर प्लॅटफॉर्म संपला आणि रेल्वेखाली आल्यानं त्यांचा मृत्यू झाला. घटनेदरम्यान चोराने विद्या पाटील यांच्या हातातील मोबाईल खेचला. विद्या यांनी त्याला प्रतिकारही केला. या झटापटीमध्ये चोरट्याने त्यांना धक्का दिला. या झटापटील त्यांचा तोल गेला.

    या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला मुंब्रा येथून अटक केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मुंबईतची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणाऱ्या मुंबई लोकलमधून सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यामुळे मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली नसतानाही चोरटा लोकलमध्ये आलाच कसा असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.