दहावी, बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक,वाचक बँक ; विभागनिहाय हेल्पलाईनची मंडळाकडून सुविधाही उपलब्ध

दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागते. अंध विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचून दाखवणे व उत्तरपत्रिकेत उत्तरे लिहिण्यासाठी लेखनिक व वाचकाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे हात नसलेल्या किंवा ऐन परीक्षेवेळी अपघात होऊन हाताला इजा झालेल्या विद्यार्थ्यांना लेखनिकाची आवश्यकता भासत असते.

  मुंबई: लेखनिक आणि वाचक न मिळाल्यास दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या परीक्षेत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी राज्य मंडळाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक व वाचक बँक बनवण्याबरोबरच स्वंतत्र हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेवेळी लेखनिक व वाचक शोधण्यासाठी करावी लागणारी धडपड आता बंद होणार आहे.

  दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागते. अंध विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचून दाखवणे व उत्तरपत्रिकेत उत्तरे लिहिण्यासाठी लेखनिक व वाचकाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे हात नसलेल्या किंवा ऐन परीक्षेवेळी अपघात होऊन हाताला इजा झालेल्या विद्यार्थ्यांना लेखनिकाची आवश्यकता भासत असते. सरकारच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना मागील इयत्तेतील किंवा प्रौढ लेखनिक देण्यात येतो. त्यामुळे बऱ्याचदा लेखनिक व वाचक मिळवण्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना अडचणी येत असतात.

  दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक व वाचक नेमून देण्याचे अधिकार हे शाळा मुख्याध्यापकांकडे असतात. ही अडचण दूर करण्यासाठी राज्य मंडळाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक व वाचक बँक तयार करण्याचे ठरवले आहे. बँक तयार करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून https://www.research.net/r/readewriterbank ही लिंक उपलब्ध करून दिली आहे. या लिंकवर ३१ मार्चपर्यंत नाव नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

  दरम्यान, विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विभागीय मंडळ स्तरावर लेखनिक व वाचक उपलब्धतेबाबत येणार्‍या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार विभागीय मंडळनिहाय कार्यालयाचे सहसचिव, सहाय्यक सचिव विद्यार्थ्यांना हेल्पलाईनद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.

  विभागनिहाय हेल्पलाईन क्रमांक

  विभाग हेल्पलाईन क्रमांक
  पुणे ९६८९७९२८९९
  नागपूर ९४०३६१४१४२
  मुंबई ७०२००१४७१४
  औरंगाबाद ९९२२९००८२५
  अमरावती ९९६०९०९३४७
  कोल्हापूर ७५८८६३६३०१
  नाशिक ८८८८३३९४२३
  लातूर ९४२१६९४२८२
  कोकण ८८०६५१२२८८