दहीहंडी उत्सवासाठी राज्याने जारी केल्या ‘या’ मार्गदर्शक सूचना

सरकारच्या नियमानुसार दहीहंडी उत्सव साधेपणाने घरी पूजाअर्चा करून साजरा करावा असे सांगण्यात आले आहे. कोरोनाचा वाढत धोका लक्षात घेत कुणीही सार्वजनिक रित्या दहीहंडी कार्यक्रमाचे सादरीकरण करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.

    मुंबई: कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्यामुळे दहीहंडी उत्सवासाठी राज्य सरकारच्या गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी करत त्यानुसारच दहीहंडी साजरी करण्यास सांगण्यात आले आहे. सरकारच्या नियमानुसार दहीहंडी उत्सव साधेपणाने घरी पूजाअर्चा करून साजरा करावा असे सांगण्यात आले आहे. कोरोनाचा वाढत धोका लक्षात घेत कुणीही सार्वजनिक रित्या दहीहंडी कार्यक्रमाचे सादरीकरण करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.

    केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दहीहंडी, गणेशोत्सवासारख्या सणांमध्ये नागरिक एकत्र आल्यास त्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे असे सण सामूहिकपणे साजरे करू नयेत, अशा सूचना केंद्र सरकारकडून आलेल्या आहेत. त्यांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याचेही राज्य सरकारने म्हटले आहे.  याचबरोबर दहीहंडीऐवजी रक्तदान , आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.