सावध राहा, तुमच्याच घरात हे लोक कधी घुसतील अन् तुमचेच लोक तुरुंगात कधी जातील कळणार नाही नवाब मलिक यांचा नितेश राणेंना सल्ला

नितेश राणे, माझा तुम्हाला सल्ला आहे. असं कुणाला फ्रेम करू नका. सावध राहा. हे लोक कधी तुमच्या घरात घुसतील आणि तुमचेच लोक कधी तुरुंगात जातील हे तुम्हाला कळणारही नाही, असा सल्ला नवाब मलिक यांनी नितेश राणे यांना दिला आहे.

  मुंबई : आर्यन खानप्रकरणावर नवाब मलिक का बोलत आहेत? आर्यन मुस्लिम असल्यामुळे मलिक बोलत आहेत का? सुशांतसिंग राजपूत हिंदू होते म्हणून गप्प होतात का?, असा सवाल भाजपचे नेते नितेश राणे यांनी केला होता. दरम्यान आता याला मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणे, माझा तुम्हाला सल्ला आहे. असं कुणाला फ्रेम करू नका. सावध राहा. हे लोक कधी तुमच्या घरात घुसतील आणि तुमचेच लोक कधी तुरुंगात जातील हे तुम्हाला कळणारही नाही, असा सल्ला नवाब मलिक यांनी नितेश राणे यांना दिला आहे.

  मलिक नेमकं काय म्हणाले?

  नितेश राणे जे बोलत आहेत ती हीच तर कारणं आहेत त्यांना फसवण्याची. मला वाटतं भाजपने हे सर्व फ्रेम केलं आहे. भाजप नेते ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यातून हे सिद्ध होत आहे. मी नितेश राणेंना सल्ला देतो. सावध राहा. कधी तुमच्या घरात कुणी घुसेल आणि तुमचेच लोकं तुरुंगात जातील हे कळणारही नाही. त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे, असं मलिक म्हणाले.

  त्या तिघांचे फुटेज जाहीर करा

  एनसीबीचे अधिकारी ग्यानेश्वर सिंग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरही त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. माझा मुद्दा हा आहे की 11 लोकं होती आणि एनसीबीने 3 लोकांना सोडलं. एनसीबी म्हणतेय 11 नाही, 14 लोकं होते. या सर्वांना रात्रभर एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. आम्ही सर्व फुटेज पाहिले. 13 लोक आहेत. 3 लोकं सोडल्यावर आम्ही हे फुटेज जाहीर केलं. आणखी तीन लोकांना सोडण्यात आले आहे. ते लोक कोण होते? त्यांची फुटेज जाहीर करा, असं आम्ही एनसीबीला आव्हान करतो. तुमच्या कार्यालयातून बाहेर पडतानाचे फुटेज जाहीर करा. भाजप नेत्यांच्या बोलण्यावर तीन लोकांना सोडण्यात आलं आहे. ही सर्व कारवाई हे फर्जीवाडा आहे, असं मलिकांनी सांगितलं.

  ते सीझर वानखेडेंच्या टेबलावरचं

  काल एनसीबीचे दिल्लीचे ग्यानेश्वर सिंग म्हणत होते की, आम्ही जागेवर पंचनामा करतो. गेल्या रविवारी साडे आठ वाजता एनसीबीने काही फोटो व्हायरल केले. त्या फोटोत एका खुर्चीवर सीझर आहे. हे फोटो त्यांनी क्राईम रिपोर्टरला पाठवले आहेत. त्याचबरोबर एनसीबीने चुकीने एक व्हिडीओही पाठवला आहे. हे सीझर हे जहाजावर नाही, टर्मिनलवर नाही तर समीर वानखेडेंच्या टेबलवरचे आहे. कर्टनही वानखेडेच्या कार्यालयातील आहे, हे त्या व्हिडीओ आणि फोटोतून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे क्रुझची केस फर्जिवाडा आहे, असा माझा दावा आहे, असं मलिक म्हणाले. ज्यांच्यावर अन्याय झाला ते कोर्टात जातील, असंही त्यांनी सांगितलं.