इतरांना संरक्षण देणारे तुम्ही आमच्याकडे संरक्षण मागताय; डीसीपींची मागणी ऐकून कोर्टान व्यक्त केले आश्चर्य

आम्हाला अटकेपासून संरक्षण देण्यात यावे अशी विनंती यावेळी डीसीपी पठण यांच्यावतीने खंडपीठासमोर कऱण्यात आली. तेव्हा, इतरांना संरक्षण देणारे तुम्ही आमच्याकडे संरक्षण मागत आहात, असे आश्चर्य व्यक्त करत त्यांची मागणी खंडपीठाने फेटाळून लावली आणि सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संबंधित खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या पोलीस उपायुक्त अबकर पठाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. त्याची दखल घेत राज्य सरकारला यासंदर्भात शुक्रवारी तातडीने भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

    डीसीपी पठाण यांच्याविरोधात खंडणी आणि फसवणुकीसंदर्भात मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. श्यामसुंदर अग्रवाल नामक भाईंदर येथील विकासकाने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. आपल्याविरोधात दाखल कऱण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत डीसीपी अकबर पठाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, पोलीस सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस उपायुक्तांविरोधात असा गुन्हा दाखल होणे ही गंभीर बाब असल्याचे खंडपीठाने नमूद केले आणि त्यासंदर्भात राज्य सरकारला शुक्रवारी तातडीने भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

    शुक्रवार(आज)पर्यंत आम्हाला अटकेपासून संरक्षण देण्यात यावे अशी विनंती यावेळी डीसीपी पठण यांच्यावतीने खंडपीठासमोर कऱण्यात आली. तेव्हा, इतरांना संरक्षण देणारे तुम्ही आमच्याकडे संरक्षण मागत आहात, असे आश्चर्य व्यक्त करत त्यांची मागणी खंडपीठाने फेटाळून लावली आणि सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली.