Covid-19 can cause loneliness and special challenges in visually impaired seniors

मुलुंडमधील काही तरुणांनी त्यांच्या सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण(vaccination of senior citizens) करण्यासाठी पुढाकार घेत अवघ्या आठ दिवसांमध्ये ४०पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण केले.

    मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून वेगाने लसीकरण मोहीम राबवण्यावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कस यांच्याबरोबर ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यावर(vaccination of senior citizens) सरकारने प्राधान्य दिले. मात्र अनेक सोसायट्यांमधील एकाकी जीवन जगत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस घेणे अशक्य होत आहे.हे लक्षात घेऊन मुलुंडमधील काही तरुणांनी त्यांच्या सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेत अवघ्या आठ दिवसांमध्ये ४०पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण केले. यामध्ये त्यांना लसीकरण केंद्रावरील अधिकार्‍यांकडूनही मोलाची साथ मिळाली.

    मुलुंड पूर्वकडील मिठागर रोड येथे असलेल्या जयरामकृष्ण हौसिंग सोसायटीत १३ इमारती आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये ४० ते ५० लोक राहतात. मुलुंडमध्ये लसीकरण केंद्र हे मुलुंड पश्चिमेला असलेल्या रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रुडास जम्बो कोविड सेंटरमध्ये आहे.

    कोरोना लसीकरण मोहीमेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. मात्र जयरामकृष्ण हौसिंग सोसायटीमध्ये अनेक वृद्ध जोडपे एकटेच राहत असल्याने आणि लसीकरण केंद्र पश्चिमेला असल्याने त्यांना पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यामध्ये अडचणी येत होत्या. ही बाब सोसायटीमध्ये राहणार्‍या तेजस जोशी याच्या लक्षात आली. त्याने सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांना आपण मदत करू शकतो का? हा विचार आपल्या मित्रांकडे व्यक्त केला. त्यातूनच तेजस जोशी, संकेत चाळके आणि प्रतिक सावंत या तरुणांनी सोसायटीतील नागरिकांना लसीकरण केंद्रांवर नेऊन त्यांचे लसीकरण करण्याचे ठरवले.

    सोसायटीतील तरुणांनी आम्हा वयोवृद्धांसाठी लसीकरणासाठी केलेल्या व्यवस्थेमुळे आम्हाला कसलाच त्रास झाला नाही. या मुलांनी समाजापुढे एक चांगले उदाहरण दाखवून दिले आहे.

    - पंढरीनाथ ठाकूर, ज्येष्ठ नागरिक, जयरामकृष्ण हौसिंग सोसायटी

    त्यानुसार त्यांनी सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांची यादी तयारी करून रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रुडास जम्बो कोविड केंद्रामधील वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली.

    केंद्रावरील अधिकार्‍यांना या तरुणांनी त्यांची कल्पना सांगितली. अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी तरुण पुढाकार घेत असल्याचे पाहुन त्यांनाही समाधान व्यक्त केले. त्यांना या तरुणांची कल्पना आवडली. लसीकरण केंद्रातील अधिकार्‍यांच्या भेटीमध्ये ठरल्याप्रमाणे हे तरुण दररोज पाच ते सहा ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी घेऊन जायचे.

    ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर नेण्यासाठी सोसायटीतील विजय जानी यांनी स्वत: गाडी देत या तरुणांच्या कार्याला हातभार लावला. लसीकरण केंद्राच्या दरवाजापर्यंत त्यांच्या गाडीला जाण्याची परवानगी मिळाली होती. सर्व नागरिकांची ऑनलाईन नोंदणी अगोदरच करण्यात येत असल्याने लसीकरणासाठी पोहोचल्यानंतर केंद्रावरील कर्मचार्‍यांकडून त्यांच्यासाठी उत्तम सोय करण्यात येत आहे.

    यामुळे  लसीकरणासाठी तीन ते चार तास लागत असताना जयरामकृष्ण सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांने एक तासांमध्ये लसीकरण होत असे. त्यामुळे अवघ्या आठ दिवसांमध्ये ४० पेक्षा अधिक नागरिकांचे काही तासांमध्ये लसीकरण झाले. सहज व कोणत्याही त्रासाशिवाय लसीकरण झाल्यामुळे सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्याकडून मुलांचे कौतुक करण्यात येत आहे.