जिल्हा परिषद पोटनिवडणूक: महाविकास आघाडीची राज्यात मुसंडी; नागपुरात मात्र अनिल देशमुख यांना जबरदस्त धक्का

राज्यातील सहा जिल्हा परिषदासाठी(Maharashtra Zilla Parishad Election) झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने 17, राष्ट्रवादीने 17 आणि शिवसेनेने 12 अशा एकूण 46 जागा जिंकल्या. तर भाजपाने 23 जागा जिंकल्या. उर्वरित 16 जागा इतर पक्षांच्या खात्यात गेल्या. नागपुरात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांना मात्र मोठा धक्का बसला. देशमुख यांच्या ताब्यातील नगरखेड पंचायत समितीवर भाजपाने विजय मिळवला.

  मुंबई : राज्यातील सहा जिल्हा परिषदासाठी(Maharashtra Zilla Parishad Election) झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने 17, राष्ट्रवादीने 17 आणि शिवसेनेने 12 अशा एकूण 46 जागा जिंकल्या. तर भाजपाने 23 जागा जिंकल्या. उर्वरित 16 जागा इतर पक्षांच्या खात्यात गेल्या. नागपुरात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांना मात्र मोठा धक्का बसला. देशमुख यांच्या ताब्यातील नगरखेड पंचायत समितीवर भाजपाने विजय मिळवला.

  अकोल्यात ‘वंचित’चाच वरचष्मा

  राज्यात अकोला, धुळे, नंदुरबार, नागपूर, पालघर आणि वाशिम या सहा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकांचे बुधवारी निकाल लागले. यात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे आडाखे चुकल्याचे दिसत आहे. काही मतदारसंघात तर सत्ताधाऱ्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने वरचष्मा सिद्ध केला. अकोल्यातील एकूण 14 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सहा जागांवर वंचितने विजय मिळवला आहे त्याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर मुसंडी मारली आहे. शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस यांना प्रत्येकी एक जागा जिंकता आली असून इतर तीन उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, वंचित पाठोपाठ बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या स्फूर्ती गावंडे अकोला तालुक्याच्या कुटासा गटातून जिल्हा परिषदेवर विजयी झाल्या आहेत.

  धुळ्यात भाजपा, वाशिममध्ये महाविकास आघाडी

  धुळे जिल्ह्यातील 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने 8, राष्ट्रवादीने 3, काँग्रेसने 2 आणि शिवसेनेने दोन जागेवर विजय मिळवला. वाशिममधील 14 पैकी राष्ट्रवादीने 5, काँग्रेस आणि भाजपाने प्रत्येकी 2, शिवसेनेने 1 आणि इतरांनी 4 जागांवर कब्जा केला. तर नंदुरबार जिल्ह्यातील 11 4 जागा भाजपाने, शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी 3 तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला.

  राजेंद्र गावितांना धक्का, मुलाचा पराभव

  गेल्या आठ वर्षांपासून पालघरचा गड आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या राजेंद्र गावित यांना आपल्याच मुलाला तेथून निवडून आणण्यात अपयश आले. पोटनिवडणुकीत डहाणू तालुक्याच्या वणई जिल्हा परिषद गटामधून रोहित गावित यांचा भाजपाचे उमेदवार पंकज कोरे यांनी पराभव केला. पालघरमध्ये 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने प्रत्येकी 5 जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या तर एक जागा इतरांच्या खात्यात गेली.

  राज्यातील सहा जिल्हा परिषदा आणि 38 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीला राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या असून त्याबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

  काँग्रेसने भाजपाला पिछाडीवर सोडले. जिल्हा परिषद पोटनिवडणूकीतदेखील काँग्रेसने मुसंडी मारली. काँग्रेसने चांगले काम केले. त्याचे फळ या निकालात पाहायला मिळाले. देशात भाजपाची वागणूक, शेतकरी विरोधी धोरण, बहुजनांच्या विरोधातील धोरण, देशाला विकण्याची जी पॉलिसी भाजपाने सुरू केली आहे. त्या व्यवस्थेला फक्त काँग्रेसचे थांबवू शकते, हे जनतेचे मत आहे.

  - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस