Ranjit Singh Disley Announced 'Global Teacher Award', Deputy Chief Minister, Chief Minister, Governor Congratulate

क्युआर कोडच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन १४० देशांतील १२ हजार शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

मुंबई : सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले (Zilla Parishad School Teacher Ranjit Singh Disley) यांना युनेस्को व लंडनच्या वार्की फाउंडेशनतर्फे संयुक्तपणे दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ (Global Teacher Award)  जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. रणजितसिंह डिसले यांना जाहीर झालेला पुरस्कार ग्रामीण भागातील शिक्षकांचा गौरव वाढवणारा तसेच ग्रामीण भागातील शिक्षण चळवळीला बळ देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी केलेले कार्य देशातीलच नव्हे तर, जगभरातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. ‘क्युआर कोड’च्या माध्यमातून त्यांनी घडवून आणलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन १४० देशांतील १२ हजार शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी झालेली निवड राज्याचा व देशाचा गौरव आहे.

पुरस्कार स्वरूपात मिळणारी ७ कोटी रुपयांची रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच ‘टीचर इनोव्हेशन फंड’साठी वापरण्याचा त्यांचा निर्धार त्यांचे जगावेगळेपण सिद्ध करणारा आहे. भारताला गुरुशिष्यपरंपरेचा गौरवशाली इतिहास आहे. रणजितसिंह डिसले यांनी ही परंपरा केवळ पुढे नेली नाही तर, या परंपरेचा गौरव वाढवण्याचं काम केलं आहे. त्यांना जाहीर झालेला ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ राज्यातील आणि देशातील शैक्षणिक चळवळीला नवीन दिशा व गती देईल, असा मला विश्वास वाटतो. रणजितसिंह डिसले यांचे मनापासून अभिनंदन, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला आहे.

रणजितसिंह डिसले यांचे मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister)  केले अभिनंदन

युनेस्को आणि लंडन येथील वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबध्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे.

पुरस्काराची बातमी समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्यांना दूरध्वनी करून अभिनंदन आणि कौतुक केले. यावेळी रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागात शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी ते करीत असलेल्या उपक्रमांची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली तसेच तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करतो ते सांगितले.

क्युआर कोडच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन १४० देशांतील १२ हजार शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ७ कोटी रुपये अशी पुरस्काराची मिळालेली रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच टीचर इनोव्हेशन फंडसाठी आपण वापरणार असल्याचे त्यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्षणासाठी दाखवलेल्या त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली आणि राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे व शिक्षणाची आवड मुलांमध्ये जोपासण्यासाठी निश्चितपणे त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल असे सांगितले. महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो आणि अशा उपक्रमशील शिक्षकांची राज्य तसेच देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे असेही मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलताना म्हणाले.

राज्यपाल कोश्यारी यांचेकडून सोलापूर येथील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांचे अभिनंदन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेले सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक श्री रणजीतसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे. सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री रणजीतसिंह डिसले यांना लंडनस्थित वर्की फाऊंडेशनच्या विद्यमाने दिला जाणारा १- दशलक्ष डॉलर पुरस्कार रक्कम असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री डिसले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

नावीन्यपूर्ण संकल्पना तसेच तंत्रज्ञानाची मदत घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे श्री डिसले कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद आहे, असे राज्यपालांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.