ऑनलाईन वधू शोधण्याच्या नादात गमविले ४० लाख; विदेशी तरुणीच्या गोड बोलण्यावर भाळला पूजारी

विदेशी तरुणीने नागपुरच्या तरुणाला लग्नासह इतर वस्तूंचे आमिष दाखवत त्याच्या कुटुंबाची तब्बल ४० लाख ६४ हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून विदेशी तरुणीसह ....

    नागपूर (Nagpur).  विदेशी तरुणीने नागपुरच्या तरुणाला लग्नासह इतर वस्तूंचे आमिष दाखवत त्याच्या कुटुंबाची तब्बल ४० लाख ६४ हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून विदेशी तरुणीसह तिचे साथीदार असे एकूण १७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

    सुनील देऊळवार (४५) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुचिता दास रा. न्यू जर्सी, ऑस्टिन व्हॉइट, महिमा, शर्मा, प्रतसो अधिकारी, नदीम खान, शंकरकुमार द्विवेदी, भोलानाथ, अजयकुमार, विक्रम सैनी, ताराचंद लुहार, जॉर्ज अपोलिनरी, आलीम आमीन व दीपक सर्व रा. नवीन दिल्ली असे आरोपींचे नाव आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, सुनील सुरेश देऊळवार महावितरणमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा भाऊ सुशील हे शेती व पूजापाठ करतात. सुशील यांच्या लग्नासाठी सुनील यांनी वधू शोधायला सुरुवात केली. ७ सप्टेंबर २०१९ ला सुशीलची प्रोफाईल भारत मेट्रीमनी या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला. या संकेतस्थळावरून त्यांची सुचिता दाससोबत ओळख झाली. तिने देऊळवार यांच्यासोबत संपर्क वाढवला. देऊळवार यांनी अमेरिकेत मोबाईल स्वस्त मिळतात. मला मोबाईल हवा असे सांगितले. तुम्ही धार्मिक लोक आहात. तुम्हाला दान दिल्याने आम्हाला पुण्य मिळेल, असे ती म्हणाली.

    मी तुम्हाला मोबाईल, लॅपटॉप एक लाख डॉलर पाठवते, असे आमिष तिने देऊळवार यांना दिले. काही दिवसांनी ऑस्टिन याने देऊळवार यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. तुमचे मोबाईल, लॅपटॉप एक लाख डॉलर दिल्ली विमानतळावर पोहोचले आहे. ते हवे असतील तर आधी कस्टम शुल्क जमा करावे लागेल, असे तो म्हणाला. त्यानंतर त्याच्या अन्य साथीदारांनीही याच बहाण्याने पैसे जमा करायला लावले. देऊळवार यांनी वेळोवेळी एकूण ४० लाख ६४ हजार ८५३ रुपये विविध खात्यात जमा केले. मात्र त्यांना ना मोबाईल मिळाला ना डॉलर. देऊळवार यांनी चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. देऊळवार यांनी बेलतरोडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

    ऑस्टिन याने देऊळवार यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. तुमचे मोबाईल, लॅपटॉप एक लाख डॉलर दिल्ली विमानतळावर पोहोचले आहे. ते हवे असतील तर आधी कस्टम शुल्क जमा करावे लागेल, असे तो म्हणाला. त्यानंतर त्याच्या अन्य साथीदारांनीही याच बहाण्याने पैसे जमा करायला लावले.