नागपुरात रविवारी आढळले ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; परिस्थिती अद्यापही आटोक्यात

    नागपूर (Nagpur): नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमालीची खालावली आहे. नागपुरात रविवारी केवळ ०६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. आरोग्य विभागाने कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढविले आहे. शहरात रविवारी ३४१६ संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ३४०६ नागरिकांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आढळून आला.

    आरोग्य विभागाकडून देण्यात येत असलेल्या प्रभावी उपचार पद्धतीमुळे रविवारी ०९ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या नागपूर शहरात केवळ ४४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची नोंद प्राप्त अहवालाद्वारे समोर आली. दिलासादायक बाब म्हणजे, शहरात रविवारी एकाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याकरिता प्रशासनाकडून सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शहरात कोरोना व्हॅक्सिनेशनचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.

    नागपूर मनपाच्या आरोग्य केंद्रांवर रविवारी १४ लाख १९ हजार ११९ नागरिकांनी कोरोनाची पहिली लस घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोज घेणाऱ्या रुग्णांची संख्या ०७ लाख ७४७ इतकी आहे. नागपूर शहरातील एकूण लसिकरणाची आजची संख्या २१ लाख १९ हजार ८८६ इतकी आहे. कोरोनाची तिसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी प्रशासन सर्वोपरी प्रयत्नशील आहे. एक जागरुक नागरिक म्हणून आपणही कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन ‘नवराष्ट्र न्यूज नेटवर्क टीम’कडून करण्यात येत आहे.