वाहतूक नियमांची खिल्ली उडविणाऱ्या २६ हजार वाहनांवर कारवाई; लाॅकडाउन काळात विक्रमी दंडवसूली

शहरात कडक लॉकडाउन (nagpur lockdown) असतानाही अनेक रिकामटेकडे बाहेर विनाकारण फिरत होते. वारंवार सांगूनही रस्त्यावर फिरणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी नागपूर पोलिसांनी (nagpur police news) थेट वाहन जप्ती (to confiscate vehicles) आणि दंड ठोठावण्याचा सपाटा सुरू केला होता.

  नागपूर (Nagpur).  शहरात कडक लॉकडाउन (nagpur lockdown) असतानाही अनेक रिकामटेकडे बाहेर विनाकारण फिरत होते. वारंवार सांगूनही रस्त्यावर फिरणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी नागपूर पोलिसांनी (nagpur police news) थेट वाहन जप्ती (to confiscate vehicles) आणि दंड ठोठावण्याचा सपाटा सुरू केला होता. गेल्या पाच महिन्यात नागपूर पोलिसांनी २५ हजार ७०८ वाहनचालकांवर कारवाई केली तर तब्बल ६ हजार ८०६ वाहने पोलिस ठाण्यात जप्त केली.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मार्च महिन्यात राज्य शासनाने कडक लॉकडाउन लावले होते. या काळात अत्यावश्‍यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याच्या सूचना होत्या. मात्र, पोलिसांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करीत अनेकांनी केवळ फेरफटका मारण्यासाठी किंवा विनाकारण रस्त्यावर फिरायला लागले होते. त्यामुळे रस्त्यावर तैनात पोलिसांनी थेट दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला. पोलिसांनी वारंवार दंडात्मक कारवाई केल्यानंतरही वाहनचालक जुमानत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी रस्‍त्यावर फिरणाऱ्यांची वाहने जप्त करणे सुरू केले.

  गेल्या वर्षी २०२० मध्ये लॉकडाउनमध्ये पोलिसांनी २७ हजार ५५६ वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ७७ लाख ५५ हजार रुपयांचा घसघशीत दंड वसुल केला. तर यावर्षी केवळ मार्च ते जून अशा तीन महिन्यांच्या लॉकडाउन काळात २५ हजार ७०८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ७७ लाख ५५ हजार रुपये दंड वसुल केला. हे प्रमाण वर्षभरातील कारवाईच्या जवळपास दुप्पट आहे. नागपूर पोलिसांनी कोरोना काळातही रस्त्यावर उभे राहून शासकीय कर्तव्य बजावून शासनाच्या गंगाजळीत लाखोंची भर टाकली.

  जप्त वाहने धूळ खात
  विनाकारण बाहेर न पडण्याच्या वारंवार सूचना देऊनही न जुमानणाऱ्या वाहनधारकांचे थेट वाहन जप्त करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला. या अभियानाची माहिती दोन दिवसांत शहरभर पसरली. तरीही पोलिसांनी चक्क ६ हजार ८०० वाहने जप्त केली. पोलिस ठाण्यात उन्हात आणि पावसात उभी करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक वाहनमालकांना लॉकडाउन तोडण्याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे.

  फिरणाऱ्यांचे हजार ‘बहाने’
  साहेब…दवाखान्यात जात आहे…किंवा मेडिकलमध्ये उपचारासाठी जात आहे, जवळपास ८० टक्के वाहनचालकांनी केवळ ही दोनच कारणे सांगितली. त्यामुळे सुरुवातीला पोलिस कारवाई न करता सोडून देत होते. परंतु, ही बनवाबनवी लक्षात आल्यानंतर पोलिस थेट डॉक्टरांनी दिलेली फाईल्स आणि रिपोर्ट्स पण तपासायला लागले होते.