मुंबई, कोकणसह मराठवाडा, विदर्भासाठी अलर्ट; राज्यात पावसाचा जोर वाढणार

राज्यात 30 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह कोकण पट्टा आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

  नागपूर : बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे राज्यात येत्या 4 ते 5 दिवसांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाचे राज्यात उद्या सोमवारपासून पुढील 4 दिवस पुन्हा आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

  ऑरेंज अलर्ट जारी

  राज्यात 30 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह कोकण पट्टा आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

  यंदाही 20.6% जास्त पाऊस

  मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत 1 जून ते 27 ऑगस्टपर्यंत सरासरी 488.6 मिमीच्या तुलनेत 589.4 मिमी म्हणजे 120.6 टक्के जास्त पाऊस पडण्याची नोंद महसूल, कृषी आणि हवामान विभागाने घेतली आहे. मंडळ, गाव, तालुकानिहाय पावसाचे प्रमाण 50 ते 90 टक्क्यांदरम्यान कमी-जास्त आहे. कमी पावसाच्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

  सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीचा प्रवास

  मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस सुरू होईल. मात्र, मध्य व दक्षिण भारतात तो ऑक्टोबरच्या पंधरवड्यानंतरही सुरूच राहील. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, कर्नाटकसह संपूर्ण दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे. उत्तर भारतात पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे.