नागपूरच्या डॉ. उज्वला चक्रदेव यांची नाथिबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

    नागपूर (Nagpur) : येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. उज्वला चक्रदेव (Dr. Ujwala Chakradev) यांची श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या (Mrs. Nathibai Damodar Thackeray Women’s University) (SNDT) कुलगुरूपदी (Vice Chancellor) नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती (Governor and Chancellor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शनिवारी (दि. ११ सप्टें) डॉ. उज्वला चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली.

    डॉ उज्वला चक्रदेव यांनी राष्ट्संत तुकडोजी महाराज नागपुर विदयापीठाच्या व्हीआरसीई येथुन वास्तुविद्याशास्त्र ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम. टेक. तसेच वास्तुविदयाशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. डॉ. चक्रदेव यांनी मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे प्राध्यापक, प्राचार्य व पीएच.डी. पर्यवेक्षक म्हणून काम केले आहे. त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकंदर ३६ वर्षांचा अनुभव लाभला आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचा कार्यकाळ २ जूलै २०२१ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

    मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर यांचेकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी छत्तिसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती न्या. यतिंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. पुणे येथील आयआयआयटीचे महासंचालक डॉ. अनुपम शुक्ला व राज्याचे प्रधान सचिव औमप्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ उज्वला चक्रदेव यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली.